Mumbai News : दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या मलबार हिल परिसरातील बाणगंगा तलावात शेकडो मासे मृत आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तलावात मोठ्या प्रमाणावर मासे मृत झाल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून पाण्यातील प्रदूषणाबाबत स्थानिक रहिवाशांमध्ये गंभीर चिंता व्यक्त होत आहे. सध्या पितृपक्ष सुरू असतानाच घडलेल्या या घटनेमुळे भाविक आणि स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे. महापालिकेने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, पुढील नुकसान टाळण्यासाठी स्थानिक नागरिक व पुजाऱ्यांसोबत तातडीने बैठकीचे आयोजन केले आहे.
ADVERTISEMENT
10 दिवसांत काय घडलं?
स्थानिक रहिवाशांच्या मते, बाणगंगा तलावात मासे मरण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत; मात्र पूर्वी अशा घटना पितृपक्षाच्या अखेरच्या दिवसांत पाहायला मिळत असत. यंदा मात्र 26 सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू झाल्यानंतर अवघ्या 10 दिवसांच्या आतच एवढ्या मोठ्या प्रमाणावर मासे मृत झाल्याचे समोर आले आहे. मृत मासे तलावातून बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक पालिकेला मदत करत आहेत. तलावातील पाण्याचा दर्जा घसरल्याने आणि ऑक्सिजनचे प्रमाण अचानक कमी झाल्यामुळे माशांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
हे ही वाचा : राहुल गांधी बॅरिकेडवर चढले, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात; निवडणूक आयोगाच्या कार्यालयाजवळ राडा
मासे का मरताहेत?
माशांच्या मृत्यूच्या कारणांवरून सध्या विविध चर्चा सुरू आहेत. पिंडदान आणि पूजेदरम्यान पाण्यात टाकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमुळे तलावातील प्रदूषण वाढून ऑक्सिजनची पातळी कमी झाली असावी, अशी आशंका काही स्थानिकांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे, वाढती उष्णता आणि पाण्याचा घसरलेला दर्जा हेदेखील यामागचे कारण असू शकते, असे काही पुजाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, पूजेचे साहित्य थेट तलावात न टाकता बाहेर ठेवलेल्या ड्रममध्ये जमा केले जाते, असा दावा तलावावरील पुजाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून सखोल तपासणीनंतरच ते स्पष्ट होणार आहे.
हे ही वाचा : बारामती दुहेरी हत्याकांडात 7 दिवसांनी सर्वात मोठा खुलासा, आरोपी सापडला
तलावाचं महत्त्व काय?
रामायण काळाशी जोडला गेलेला बाणगंगा तलाव हा मुंबईतील अत्यंत पवित्र मानला जाणारा ऐतिहासिक वारसा आहे. प्रभू श्रीरामांना तहान लागली असता लक्ष्मणजींनी जमिनीवर बाण मारून पाताळगंगेला येथे प्रकट केले, अशी आख्यायिका या तलावामागे आहे. अशा पौराणिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या पवित्र तीर्थक्षेत्री माशांचा मोठ्या प्रमाणावर झालेला मृत्यू ही अत्यंत खेदजनक बाब आहे. पालिकेकडून लवकरच पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करून तलावाच्या स्वच्छतेसाठी आणि भविष्यातील संरक्षणासाठी ठोस उपाययोजना केल्या जाणार आहेत.
ADVERTISEMENT












