Mumbai Water Stock News : मुंबईकरांची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच 84.35 टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. गेल्या आठ वर्षांतील या तारखेला नोंदवलेला हा सर्वात नीचांकी पाणीसाठा आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाणीसाठ्यात मोठी घट झाल्यामुळे आगामी काळात मुंबईकरांवर पाणीटंचाईचे सावट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT
बाष्पीभवनामुळे नुकसान
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) लेखापरीक्षणातून (ऑडिट) एक धक्कादायक माहिती समोर आली असून, ऑक्टोबर महिन्यात शहरातील तीन प्रमुख जलाशयांमध्ये बाष्पीभवनामुळे होणारे पाण्याचे नुकसान गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट किंवा त्याहूनही अधिक झाले आहे. एका रिपोर्टनुसार, 3 नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार, सातही धरणांमध्ये मिळून सध्या सुमारे 12.20 लाख मिलियन लिटर पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षांच्या आकडेवारीशी तुलना केल्यास, गेल्या वर्षी याच तारखेला 95.67 टक्के, 2024 मध्ये 93.75 टक्के आणि 2023 मध्ये 89.46 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.
हे ही वाचा : 13 शिक्षकांची आत्महत्या, 400 कोटींची थकबाकी; पुण्यातील प्रसिद्ध शिक्षणसंस्थेला उच्च न्यायालयाचा दणका
गेल्या वर्षीच्या तुलनेत किती पाणीसाठा?
धरणांच्या पाणीपातळीचा आढावा घेतल्यास, मुंबईच्या पाणीपुरवठ्याचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मोडक सागर धरणात सध्या केवळ 49.02 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, जो गेल्या वर्षी याच दिवशी 84 टक्के इतका होता. तसेच तानसा धरणात गेल्या वर्षीच्या 95.92 टक्क्यांच्या तुलनेत यंदा 81.84 टक्के, तर मध्य वैतरणा धरणात 80.84 टक्के पाणी आहे. याव्यतिरिक्त भातसा धरणात 88.37 टक्के, अप्पर वैतरणामध्ये 94.87 टक्के, विहार तलावात 99.95 टक्के आणि तुळशी तलावात 97.09 टक्के पाणीसाठा नोंदवला गेला आहे.
हे ही वाचा : पालघर : छेडछाडीचा जाब विचारल्याने लोकलखाली ढकललं; तरुणीने गमावला हात
मुंबईकरांवर पाणीसंकट?
वाढत्या बाष्पीभवनासोबतच आगामी काळात 'एल निनो'च्या (El Nino) संभाव्य परिणामामुळे पावसावर किंवा हवामानावर प्रतिकूल परिणाम होण्याच्या शक्यतेने पाणीसंकटाच्या चिंतेत आणखी भर घातली आहे. उन्हाळ्याचे कडक महिने अद्याप दूर असतानाच धरणांतील पाण्याने तळ गाठण्यास सुरुवात केल्याने, मुंबईकरांना पाण्याचा वापर अत्यंत जपून आणि काटकसरीने करावा लागणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
ADVERTISEMENT












