Navi Mumbai Crime : नवी मुंबईतील शीव-पनवेल महामार्गावर रात्रीच्या वेळी वाहनचालकांना त्रास देणाऱ्या तृतीयपंथीयांविरोधात अखेर पोलीस दलाने धडक कारवाई केली. अंधार पडल्यानंतर सिग्नलजवळ उभे राहून वाहनचालकांकडून गैरवर्तन, त्रास आणि दबाव टाकल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने येत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने विशेष मोहीम राबवून दहा तृतीयपंथीयांना ताब्यात घेतले.
ADVERTISEMENT
अश्लील चाळे करणारे 10 तृतीथपंथीय पोलिसांच्या ताब्यात
मिळालेल्या माहितीनुसार, सीबीडी उरण फाटा, कळंबोली सर्कल आणि स्टील मार्केट परिसरात हा प्रकार सर्वाधिक वाढला होता. अनेक वाहनचालकांनी रात्री उशिरा या ठिकाणी जाण्याचे टाळण्यास सुरुवात केली होती. काहींनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून या त्रासाबद्दल तक्रारी दिल्या होत्या. उच्छाद वाढू लागल्यानंतर संबंधित विभागाने या ठिकाणांचा प्रत्यक्ष आढावा घेतला आणि कारवाईची तयारी केली.
हेही वाचा : लग्नानंतर हुंड्याची मागणी, शारीरिक छळ, पतीचे अनैतिक संबंध अन्... महिला पोलीस कॉन्स्टेबलचे पतीवर गंभीर आरोप
वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सोमवारी रात्री उरण फाटा परिसरातून पाच आणि कळंबोली येथून आणखी पाच तृतीयपंथीयांना ताब्यात घेतले. त्यांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणण्यात आले असून त्यांच्याकडून या उच्छादामागील कारणे आणि त्यांच्या हालचालींचा तपशील घेतला जात आहे. या कारवाईमुळे स्थानिक वाहनचालकांनी दिलासा व्यक्त केला असून रात्रीच्या वेळी या मार्गांवर पुन्हा सुरक्षित वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पोलीस विभागाने सांगितले की, वाहनचालकांच्या सुरक्षिततेला आणि सार्वजनिक शिस्त राखण्याला प्राधान्य देत ही कारवाई करण्यात आली आहे. पुढील काही दिवस या परिसरात गस्त वाढवून अशा प्रकारांना आळा घालण्याचे नियोजन आहे. तसेच, पुन्हा असे प्रकार आढळल्यास तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले. या मोहिमेमुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्येवर काही प्रमाणात उपाय झाला असला, तरी अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी स्थानिक प्रशासन, समाजसंस्था आणि पोलीस यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचेही बोलले जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











