-पारस दामा, मुंबई
ADVERTISEMENT
Navi Mumbai Metro news in Marathi : तब्बल 13 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर नवी मुंबईकरांच्या सेवेसाठी मेट्रो सुरु करण्यात आली. शुक्रवारी (१७ नोव्हेंबर) 6 वाजता बेलापूर मेट्रो स्टेशनवरून पहिली मेट्रो धावली. पहिल्या गाडीत मोठी गर्दी पाहायला मिळाली. नवी मुंबईतील बेलापूर मेट्रो स्थानकापासून सुरू होणारी ही मेट्रो पेंढर मेट्रो स्थानकापर्यंत धावणार आहे, या मार्गावर 11 मेट्रो स्थानके असतील आणि 11.10 किलोमीटर इतका हा मार्ग आहे.
नवी मुंबईकरांना मिळाली पहिली मेट्रो
गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबईकर ही मेट्रो सुरू होण्याची वाट पाहत होते. गेल्या 6 महिन्यांत या मेट्रोचे अधिकृत उद्घाटन 4 वेळा लांबले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकृत उद्घाटनाविना ही मेट्रो नवी मुंबईकरांसाठी सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर ही सेवा सुरु करण्यात आली.
Navi Mumbai Metro Route : वेळ आणि मार्ग
17 नोव्हेंबरपासून नवी मुंबई मेट्रोचे नियमित धावण्यास सुरू झाली असून, यामध्ये ही मेट्रो दररोज सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत दर 15 मिनिटांच्या अंतराने धावणार आहे. ही मेट्रो सेवा पेंडर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेंडरपर्यंत दर 15 मिनिटांनी धावणार आहे. ही मेट्रो सिडकोने बांधली असून त्यात लोकांच्या आरामदायी आणि सुलभ प्रवासासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा >> ‘…मग अजितदादा अन् देवेंद्र फडणवीसांना कुठं पाठवतो?’, जरांगेंचा भुजबळांना सवाल
नवी मुंबई मेट्रोचे तिकीट दर किती?
या मेट्रोमध्ये प्रवास करण्यासाठी 0-2 किमीसाठी 10 रुपये, 2-4 किमीसाठी 15 रुपये, 4-6 किमीसाठी 20 रुपये, 6-8 किमीसाठी 25 रुपये, 8-10 किमीसाठी 30 रुपये तिकीट दर असणरा आहे. तसेच 10 किमीच्या पुढे ते 40 रुपये तिकीट असणार आहे.
हे ही वाचा >> …अन् बाळासाहेबांसाठी नारायण राणे बनले ‘सुरक्षारक्षक’! लोणावळ्यातील बंगल्यातला किस्सा काय?
लोकांमध्ये उत्साह
ही मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर सर्वसामान्य नवी मुंबईकर प्रचंड खूश आहेत. ही मेट्रो सुरू झाल्यानंतर प्रवासाचा वेळ वाचणार असून प्रवासही आरामदायी होणार आहे. पूर्वी या मार्गावर जाण्यासाठी लोकांना बस आणि ऑटोने जावे लागत होते आणि त्यासाठी जास्त वेळ लागत होता. मात्र ही मेट्रो सुरू झाल्यानंतर लोक खूप खूश आहेत आणि त्यांच्या मते ही मेट्रो खूप महत्त्वाची होती.
ADVERTISEMENT
