पालघर : महावितरणच्या वायरमनला 40 हजारांची लाच घेताना अटक

Palghar news : महावितरणच्या वायरमनला 40 हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

20 Oct 2025 (अपडेटेड: 20 Oct 2025, 10:13 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

महावितरणच्या वायरमनला लाच घेताना अटक

point

40 हजारांची मागितली होती लाच

Palghar news : पालघर जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने कारवाई करत महावितरणमधील वायरमनला 40,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. वीजमीटर परत जोडण्यासाठी वायरमनकडून लाचेची मागणी करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव राजेश सरोज (वय 45) असे असून ते महावितरणच्या बिलालपाडा कार्यालयात वायरमन म्हणून कार्यरत आहेत.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सुतारकामाचे काम करून उपजीविका चालवतात. त्यांच्या घरातील वीजबिलाची रक्कम काही दिवस थकीत राहिल्याने वायरमन राजेश सरोज यांनी त्यांचे वीज कनेक्शन तोडले आणि वीजमीटर काढून नेले. त्यानंतर तक्रारदारांनी थकीत बिलाची रक्कम भरून घेतली आणि त्याचा स्क्रीनशॉट वायरमनच्या मोबाइलवर पाठवला, तसेच मीटर पुन्हा जोडून देण्याची विनंती केली. मात्र, वायरमन सरोज यांनी मीटर पुन्हा बसवण्यासाठी थेट ₹40,000 लाचेची मागणी केली.

या अन्यायकारक मागणीमुळे तक्रारदारांनी पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. सहाय्यक पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे सोमवारी वायरमन राजेश सरोज यांनी तक्रारदाराकडून मागितलेली रक्कम स्वीकारली आणि त्याचवेळी ACB च्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाच घेण्यासाठी वापरलेली रक्कम तपासणीदरम्यान जप्त करण्यात आली असून आरोपीविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला गेला आहे. प्राथमिक चौकशीत आरोपीने लाच मागितल्याचे स्पष्ट पुरावे मिळाले आहेत.

या कारवाईनंतर महावितरण विभागात खळबळ उडाली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांकडून अशा प्रकारे लाचेच्या मागण्या वाढत असल्याबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. वीजबिल भरूनही साधी मीटरजोडणी मिळवण्यासाठी सामान्य नागरिकांना भ्रष्टाचाराचा सामना करावा लागतो, हे पुन्हा एकदा उघड झालं आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केलं आहे की, सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच मागत असल्यास त्वरित तक्रार नोंदवावी, जेणेकरून अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करता येईल.

या प्रकरणाचा पुढील तपास पालघर ACB करत असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. महावितरणकडूनही अंतर्गत तपास सुरू असून या घटनेनंतर संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वीजबिल, जोडणी आणि सेवा मिळवण्यासाठी लाच मागितल्याच्या घटना वारंवार समोर येत असल्याने सामान्य जनतेत असंतोष आहे. मात्र, ACBच्या या कारवाईमुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मुंबईतील राम मंदिर रेल्वे स्थानकावर जन्मलेल्या बाळाची प्रकृती चिंताजनक, बाळाच्या हृदयाला छिद्र, महत्त्वाची माहिती समोर

    follow whatsapp