धारवाड : गदग–हुबळी राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात हावेरी येथील पोलिस निरीक्षक पंचाक्षरी सालीमठ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुभाजकाला झालेल्या जोरदार धडकेनंतर त्यांच्या कारला अचानक आग लागली आणि काही क्षणांतच वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. कारचे दरवाजे जॅम झाल्याने त्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे ते आतच अडकले आणि जिवंत जळून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने पोलिस दलात आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, पंचाक्षरी सालीमठ हे गदग येथे कुटुंबीयांना भेटून पुन्हा कार्यस्थळी म्हणजेच हावेरीकडे जात होते. सायंकाळी ते हुबळीच्या दिशेने प्रवास करत असताना अन्नीगेरी तालुक्यातील भद्रापूरजवळ अपघात झाला. अरेरा पुलाजवळील वळणावर त्यांची कार अचानक नियंत्रणाबाहेर गेली. वाहन दुभाजकावर जाऊन आदळताच पेट्रोल टँक फुटल्यासारखा जोरदार स्फोट झाला आणि कारला क्षणार्धात आग लागली.
रस्त्यावरून गाड्या वेगाने धावत असतानाच हे सर्व काही काही क्षणांत घडले. सालीमठ यांच्या कारमध्ये आग पसरल्यावर ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होते, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र धडकेचा जोर आणि त्यानंतर कारचे दरवाजे जॅम झाल्यामुळे त्यांना मार्ग मिळाला नाही. आग अत्यंत झपाट्याने पसरल्याने कोणीही जवळ जाऊन मदत करण्यास धजावले नाहीत. काही वाहनचालकांनी तात्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाला कळविले. परंतु घटनास्थळी पोहोचेतोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती.
हेही वाचा : पुणे : जुन्नरमध्ये तीन कुत्र्यांनी मिळून बिबट्याला पिटाळून लावलं; पाहा व्हिडीओ
अग्निशमन दलाने आग विझवून परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर कारच्या आतील भागातून सालीमठ यांचे जळालेले शव बाहेर काढण्यात आले. त्यांचा मृत्यू जागीच झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुष्टी केली. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी वाहनाचा वेग, रस्त्यावरील वळण आणि नियंत्रण सुटणे ही प्राथमिक कारणे मानली जात आहेत.
पंचाक्षरी सालीमठ हे कठोर पण संवेदनशील अधिकारी म्हणून ओळखले जात. हावेरी जिल्ह्यात त्यांच्या कामाची चांगली प्रतिष्ठा होती. ड्युटीवर तत्परता, शिस्त आणि गुन्हेगारीविरोधातील सक्रिय धोरण यांसाठी त्यांनी विशेष छाप पाडली होती. त्यांच्या आकस्मिक निधनाने पोलिस विभागात शोककळा पसरली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुःख व्यक्त केले आहे.
या अपघातानंतर संबंधित विभागाने रस्ते सुरक्षेबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील वेग, वळणे आणि रात्रीच्या प्रवासातील जोखीम याबद्दल जनजागृती करण्याची गरज असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. सालीमठ यांच्या निधनाने एक सक्षम अधिकारी गमावल्याची भावना सर्वांमध्ये व्यक्त होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
वर्धा: घरात आई-वडिलांचे सतत वाद... डिप्रेशनमध्ये गेलेल्या मुलीने विषारी वायू गिळून संपवलं आयुष्य!
ADVERTISEMENT











