Pune Crime News : भुसावळ तालुक्यातील कुन्हे पानाचे परिसरातील शेतात शुक्रवारी संध्याकाळी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्यानंतर गावात खळबळ उडाली होती. आता या मृतदेहाची ओळख पटली असून तो पुण्यातील वाघोली येथील बेपत्ता बाळू मारुती शिंगोडे (वय 56) यांचा असल्याची माहिती अधिकृतरीत्या समोर आली आहे.
ADVERTISEMENT
अधिकची माहिती अशी की, शुक्रवारी (5 डिसेंबर) सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास गावातील काही नागरिकांना शेतात एका व्यक्तीचा मृतदेह पडलेला दिसला. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ गावच्या पोलिस पाटील मनीषा बाविस्कर यांच्याशी संपर्क साधला. बाविस्कर यांनी तत्काळ भुसावळ तालुका पोलिसांना कळवून पथकाला घटनास्थळी रवाना केले.
सूचना मिळताच पोलिस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ. धीरज मंडलिक घटनास्थळी पोहोचले. पाहणीदरम्यान मृत व्यक्तीच्या कपड्यांमध्ये एक चिठ्ठी आढळली. त्यावर “बाळू मारुती शिंगोडे, रा. वाघोली, पुणे” अशी माहिती लिहिलेली होती. यानुसार भुसावळ पोलिसांनी लगेच वाघोली पोलिसांशी संपर्क साधला असता, बाळू शिंगोडे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची नोंद करण्यासाठी त्यांचे नातेवाईक पोलिस ठाण्यात आले होते, अशी माहिती मिळाली.
यानंतर पोलिसांनी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना भुसावळ येथे बोलावले. त्यांनी मृतदेह पाहून त्याची ओळख निश्चित केली. नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळू शिंगोडे हे मानसिक आजाराने त्रस्त होते. त्यांच्या 72 वर्षीय आईशिवाय त्यांना इतर जवळचे नातेवाईक नव्हते.
मृतदेहाचे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. प्राथमिक चौकशीमध्ये मृताने कोणता तरी विषारी पदार्थ प्राशन केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, ते पुण्यातून भुसावळ तालुक्यातील दुर्गम शेतशिवारात कसे पोहोचले, याबाबत अद्यापही कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.
या घटनेची नोंद भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास पो.नि. महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ. विकास बाविस्कर करीत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











