सातारा: पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कराड तालुक्यातील उंब्रज-भोसलेवाडी परिसरात मुसळधार पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसभर पावासाच्या जोरदार सरी बरसत असल्याने महामार्गावर पाणी साचले आहे. तर संपूर्ण रस्त्याला अक्षरशः नदीचे स्वरूप आले आहे.
ADVERTISEMENT
महामार्गावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने वाहनधारकांना अत्यंत धोकादायक परिस्थितीतून प्रवास करावा लागत असल्याचं दिसून आलं. पाण्याखाली रस्ता दिसत नसल्याने अनेक वाहनचालक अडचणीत सापडले असून अपघात होण्याचा धोका वाढला आहे.
दरम्यान, स्थानिक प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी लक्ष घालून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.
हे ही वाचा>> आरारारारा खतरनाक! सरकारी कार्यालयात पॉर्न व्हिडीओ शूट करायचा, पती डॉक्टरला बायकोनं पाहिलं अन् घडलं...
पश्चिम महाराष्ट्रात दोन दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून साताऱ्यासह संपूर्ण प. महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. सातारा जिल्ह्यातील अनेक भागात या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. या मुसळधार पावसामुळे सातारा शहरासह परिसरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांना देखील या पावसाचा मोठा फटका बसला आहे.
पावसामुळे कांद्याचे आणि इतर पिकांचे देखील विक्री अभावी मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर शहरातील विविध परिसरात वादळी वाऱ्यामुळे मोठी पडझड झाल्याने या पडझडीचा मोठा फटका सामान्य नागरिकांना बसला आहे. तर सातारा शहरातील गोडोली परिसरातील अनेक भागातील रस्त्याकडेला असलेल्या नागरिकांच्या दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने त्यांना देखील या पावसाचा मोठा फटका सहन करावा लागला आहे.
हे ही वाचा>> कोकणात मेघगर्जना, विजांचा कडकडाट अन् सोसाट्याचा वारा..तर मुंबईत पाऊस घालणार धुमाकूळ? जाणून घ्या आजचं हवामान
सातारा शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या पावसामुळे सातारकर चांगलेच गारठले असून यंदा मान्सून देखील वेळेत दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिल्याने शेतकरी देखील आता मशागतीच्या कामाला लागला आहे.
कोकणातही जोरदार पाऊस, मच्छिमारांना पुढील दोन-तीन दिवस समुद्रात न जाण्याच्या इशारा
प. महाराष्ट्रासह कोकणात देखील जोरदार पाऊस बरसत आहे. कर्नाटक समुद्र भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकणात विशेष करून सिंधुदुर्गात कालपासून मान्सूनपूर्व पावसाने थैमान घातले आहे. जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी सकल भागामध्ये पाणी साचलेले देखील पाहायला मिळाले.
मात्र, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन-तीन दिवस मच्छीमार बांधवांना समुद्रामध्ये न जाण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सुरक्षित अशा देवगड बंदरामध्ये देवबाग, मालवण, वेंगुर्ला आणि गोवा राज्यातील मच्छीमारी नौका आश्रयाला दाखल झाल्या आहेत.
ADVERTISEMENT
