Satara Crime : सातारा तालुक्यातील निनाम पाडळी परिसरात सहा महिन्यांपूर्वी घडलेली एक भयावह घटना अखेर समोर आली आहे. गावातील 43 वर्षीय शेतमजूर राहत्या घरातून बेपत्ता झाल्यानंतर त्याचा शोध लागला नाही. मात्र पोलिसांच्या तपासातून त्याचा खून झाल्याचे उघड झाल्याचे समोर आले आहे. हा खून गावातच राहणाऱ्या एका माजी सैनिकाने केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक करून या प्रकरणाची अधिक माहिती मिळवण्यास सुरुवात केली आहे.
ADVERTISEMENT
शेतमजूर बेपत्ता झाल्याची नोंद, पण मागे होता खुनाचा थरार
संभाजी बाळू शेलार (वय 43) हे या गावात मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. 8 जून 2025 रोजी ते अचानक गायब झाले. कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी शोध घेतला पण त्यांचा काहीच मागमूस न लागल्याने बोरगाव पोलीस ठाण्यात त्यांची बेपत्ता नोंद करण्यात आली होती. सुरुवातीला हा साधा बेपत्ता होण्याचा प्रकार असल्याचे पोलिसांना वाटत होते. परंतु काही दिवसांनंतर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीमुळे प्रकरणाचा पूर्णतः वेगळाच पैलू समोर आला.
माजी सैनिकावर संशय; पोलिसांनी घेतली चौकशी
पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर भरत ऊर्फ मधू रंगराव ढाणे (वय 48) या माजी सैनिकावर संशय उपस्थित झाला. त्यानंतर त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या ढाणे याने अखेर पोलिसांच्या कड्या चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. शेलार यांचा खून स्वतःने केल्याचे त्याने मान्य केले.
हेही वाचा : धुळे : पेढ्यातून गुंगीचे औषध दिलं, मुख्याध्यापकाचा महिलेवर अत्याचार, व्हिडीओ व्हायरल करतो म्हणत 60 लाख उकळले
कपाटातील पैसे चोरी गेल्याचा राग जीवावर बेतला
तपासात समोर आलेल्या माहितीप्रमाणे, संभाजी शेलार यांनी आरोपी ढाणे यांच्या घरातील कपाटातून काही रक्कम चोरल्याचा संशय ढाणे याला होता. या घटनेवरून दोघांमध्ये तीव्र वाद झाला. संशय वाढत गेल्यानंतर आरोपीने रागाच्या भरात धारदार शस्त्राने संभाजी शेलार यांच्यावर हल्ला केला आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला
खून केल्यानंतर पकडले जाईल या भीतीने आरोपीने मध्यरात्रीच्या सुमारास मृतदेह घराच्या पाठीमागे नेला. तेथे लाकडांचा ढीग रचून मृतदेह जाळून टाकला, जेणेकरून कुठलाही पुरावा शिल्लक राहणार नाही. मृतदेहाची राखही परिसरातील मोकळ्या जागेत टाकून पुरावा पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सहा महिने प्रकरण दडले; अखेर उलगडा
सहा महिन्यांपासून हा गुन्हा लपून राहिला होता. केवळ बेपत्ता प्रकरण म्हणून तपास सुरू असताना पोलिसांनी मिळवलेल्या गोपनीय माहितीमुळे संपूर्ण घटना समोर आली. चौकशीत आरोपीने केलेल्या खुलाशामुळे पोलिसांनी ठोस पुरावे गोळा करून त्याला अटक केली आहे. या खुनामुळे निनाम पाडळी परिसरात एकच खळबळ उडाली असून, माजी सैनिकाकडून असे अमानवी कृत्य घडल्याने गावकरी हादरले आहेत. पुढील तपास सातारा पोलिसांकडून सुरू आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
BMW कार,लाखोंचे दागिने अन् iphone; रीलस्टारने इन्स्टाग्रामवर गर्भश्रीमंत मुलींना पटवून माया जमवली
ADVERTISEMENT











