Air India plane crash: गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया फ्लाइट क्रॅशच्या तपासादरम्यान महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. हा अपघात कोणत्याही तांत्रिक बिघाडामुळे झाला नसून, जाणूनबुजून केलेल्या कृत्यामुळे झाल्याचा निष्कर्ष तपासकर्त्यांनी काढला आहे. इटालियन दैनिक वृत्तपत्र Corriere della Sera यांनी नवी दिल्ली आणि वॉशिंग्टनमधील चर्चेशी परिचित असलेल्या दोन सूत्रांचा हवाला देत हे वृत्त दिल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
वृत्तानुसार, भारतीय तपासकर्त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की 12 जून 2025 रोजी इंजिनमध्ये इंधनाचा पुरवठा बंद पडल्यानंतर झालेला अपघात यांत्रिक बिघाडामुळे नव्हता तर जाणीवपूर्वक केलेल्या कृतीमुळे झाला होता. अधिकारी आता आपल्या अंतिम अहवालाचा ड्राफ्ट बनवण्याच्या तयारीत आहेत. वृत्तपत्राने पुढे म्हटलं आहे की, तपासात मदत करणाऱ्या अमेरिकन तज्ज्ञांनी या निष्कर्षाला मोठं यश असल्याचं म्हटलं आहे.
एअर इंडियाचा बोइंग 787 ड्रीमलाइनर, अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदांनी क्रॅश झाला. या अपघातात एकूण 260 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात प्रवासी आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात उपस्थित असलेल्या लोकांचा देखील समावेश होता. या दुर्घटनेत केवळ एका प्रवाशाचा सुदैवाने जीव वाचला.
जुलै 2025 मध्ये भारताच्या विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) ने प्रसिद्ध केलेल्या प्राथमिक अहवालात पायलटने फ्यूल कंट्रोल बंद केल्याबद्दलच्या शेवटच्या कॉकपिट संभाषणाचा उल्लेख केला होता. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये ऐकू आलं की, एका पायलटने विचारले, "फ्यूएल का बंद केलं?" तर दुसऱ्याने उत्तर दिले, "मी नाही केलं."
इंजिन फ्यूएल कंट्रोल स्विच बंद केल्याचा दावा
तपासकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या दोन्ही पायलट्सपैकी एकाने इंजिन फ्यूएल कंट्रोल स्विच बंद केलं होतं आणि त्यामुळे एअरक्राफ्टची पावर गेल्याने ते जमिनीवर कोसळल्याचा दावा रिपोर्ट्समध्ये करण्यात आला. कॅप्टन सुमीत सभरवाल हे पायलट-इन-कमांड होते, तर फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर हे को-पायलट होते. नव्या रिपोर्टनुसार, "जबाबदारी अद्याप स्पष्ट नाही. मुख्य संशयित कॅप्टन सुमित सभरवाल असून ते अपघातानंतर नैराश्याने ग्रस्त असल्याचं आढळून आलं."
AAIB च्या सुरुवातीच्या तपासानंतर, सभरवालच्या वडिलांनी आपल्या मुलावरील सर्व आरोप फेटाळून लावले असून नव्या तपासाची मागणी केली आहे. तसेच, त्यांनी त्यांच्या मुलाच्या मानसिक आरोग्याबद्दलचे आरोप देखील फेटाळून लावले. घटस्फोटासह वैयक्तिक समस्यांमुळे संशयित पायलट नैराश्यात असल्याच्या म्हणण्याला कॅप्टन सुमित यांच्या वडिलांनी स्पष्टपणे नकार दिला.
वृत्तानुसार, ब्लॅक बॉक्स डेडाच्या आधारे सुरुवातीच्या टेक्निकल असेसमेंटमध्ये मॅकेनिकल बिघाड झाल्याचं नाकारण्यात आलं आणि त्याऐवजी इंजिन इग्निशन आणि शटडाउन नियंत्रित करणाऱ्या स्विचच्या मॅन्युअल हालचालीकडे लक्ष वेधण्यात आलं. तसेच, विमान क्रॅशच्या वेळी प्लेनचे दोन्ही इंजिन बंद झाल्याचं समोर आलं.
ADVERTISEMENT











