Crime News : अहमदाबादमधील सरखेज परिसरात 22 वर्षीय सोफिया फारूक हिच्या हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सोफियाचे वडील मोहम्मद फारूक नवाबखान (56) आणि भाऊ मोहम्मद हाबिल फारूक (38) यांना अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सुमारे तीन महिन्यांपूर्वी सोफियाचा एका तरुणासोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामुळे तिचे वडील आणि भाऊ नाराज होते. सोफिया इतर तरुणांशी बोलत असल्याचाही त्यांना आक्षेप होता. याच कारणातून दोघांनी तिच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.
ADVERTISEMENT
सोफिया जुहापुरा परिसरातील एका रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. 12 ऑगस्टच्या रात्री ती भाऊ हाबिलसोबत दुचाकीवरून जात होती. त्यावेळी अज्ञात वाहनाने दुचाकीला मागून धडक दिल्याचा दावा करण्यात आला होता. या कथित अपघातानंतर सोफियाला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या डोक्याच्या मागील बाजूला आणि पायांना गंभीर दुखापत झाली होती. तिला सोला सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, 13 ऑगस्ट रोजी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
हेही वाचा : अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी सुजय विखे, उपाध्यक्षपदी देशमुख; विखे-थोरात एक्स्प्रेस जोरात!
मर्डर केला अन् रचला हिट अँड रनचा बनाव
सुरुवातीला पोलिसांनी हा हिट अँड रनचा प्रकार असल्याचे मानून तपास सुरू केला होता. हाबिलच्या तक्रारीवरून अज्ञात वाहनाविरोधात अपघाताची चौकशी सुरू झाली. मात्र, तपासादरम्यान पोलिसांना हाबिलने सांगितलेल्या घटनेबाबत संशय निर्माण झाला. कथित अपघाताच्या ठिकाणी वाहनाच्या धडकेचे पुरेसे पुरावे मिळाले नाहीत. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दुचाकीला धडक देणारे दुसरे कोणतेही वाहन दिसून आले नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय सोफियाच्या भावावर बळावला. त्याची कसून चौकशी केल्यानंतर या प्रकरणातील कथित हत्येचा कट उघड झाल्याचा पोलिसांचा दावा आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, सोफियाची हत्या करण्यासाठी तिचे वडील आणि भावाने आधीपासूनच योजना आखली होती. 12 ऑगस्ट रोजी दोघेही सोफिया काम करत असलेल्या रुग्णालयाजवळ पोहोचले. त्यानंतर तिला दुचाकीवरून सोबत घेऊन गेले. सरखेजमधील घेलजीपुरा गावाजवळील निर्जन ठिकाणी तिला नेण्यात आले. हाबिलने आपल्या पँटमध्ये लोखंडी हातोडा लपवून ठेवल्याचा आरोप आहे. निर्जन ठिकाणी पोहोचल्यानंतर त्याने सोफियाच्या डोक्यावर हातोड्याने तीन वेळा वार केले. यावेळी वडील फारूक यांनीही त्याला साथ दिल्याचा आरोप आहे. सोफिया बेशुद्ध झाल्यानंतरही तिच्यावर पुन्हा हातोड्याने हल्ला करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तिचा मृत्यू होईपर्यंत दोघेही घटनास्थळी थांबले होते, असा पोलिसांचा दावा आहे. कुटुंबाची सामाजिक प्रतिष्ठा जपण्याच्या नावाखाली ही हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
सोफियाच्या मृत्यूनंतरही आरोपींनी कथितपणे पुरावे लपवण्याचा प्रयत्न केला. दोघांनी तिचा मृतदेह दुचाकीवरून नेऊन रस्त्याच्या कडेला ठेवला. त्यानंतर हाबिलने स्वतःला जखमी केले आणि दुचाकीचेही नुकसान केले. त्यामुळे ही घटना अपघात असल्याचे भासवता येईल, असा त्यांचा प्रयत्न होता. कमी सीसीटीव्ही कॅमेरे असलेला आणि रात्री अंधार असणारा रस्ता त्यांनी निवडल्याचेही तपासात समोर आले आहे. सुरुवातीला वाहतूक पोलिसांकडून अपघात म्हणून तपास सुरू होता. मात्र, जवळपास महिनाभर चाललेल्या तपासात सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरील पुरावे आणि चौकशीतून वेगळीच माहिती समोर आली. त्यानंतर एम डिव्हिजन पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून मोहम्मद फारूक नवाबखान आणि मोहम्मद हाबिल फारूक यांना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT












