Crime News : उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातून लग्नातील एका विचित्र आणि संतापजनक घटनेचा प्रकार समोर आला आहे. रामनगर तहसीलच्या गणेशपूर गावात शुक्रवारी रात्री जयमालेच्या वेळी नवरदेवाने दारूच्या नशेत मर्यादा ओलांडली. नशेत असलेल्या नवरदेवाने चक्क स्टेजवरच नवरीला लाथ मारली आणि मध्यस्थी करायला आलेल्या सासऱ्यालाही मारहाण केली. या प्रकारानंतर लग्नमंडपाचे रूपांतर युद्धभूमीत झाले.
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार बहराइच जिल्ह्यातील मुराइनपुरवा येथून विशाल नावाच्या तरुणाची वरात गणेशपूर येथे आली होती. सुरुवातीला सर्व काही उत्साहात सुरू होते. मात्र रात्री 11 च्या सुमारास जेव्हा जयमाला विधीसाठी नवरदेव विशाल स्टेजवर चढला तेव्हा तो नशेमुळे स्वतःवरचे नियंत्रण गमावून बसला होता. हार घालताना अचानक त्याने नवरीला निशा लाथ मारली. हे पाहून उपस्थित पाहुणे आणि वधूपक्षाचे लोक अवाक झाले.
सासर्याला मारहाण आणि खुर्च्यांची तोडफोड
आपल्या मुलीला वाचवण्यासाठी वडील सत्रोहन पुढे सरसावले असता नवरदेवाने त्यांनाही धक्काबुक्की आणि मारहाण केली. यामुळे वधूपक्षाचा संयम सुटला आणि दोन्ही बाजूंनी जोरदार हाणामारी सुरू झाली. संतप्त नातेवाईकांनी मंडपातील डझनावारी खुर्च्या तोडल्या. या राड्यात नवरदेवाची बहीण मेहुणा आणि एक वऱ्हाडी गंभीर जखमी झाले आहेत. पाहुण्यांनी जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धाव घेतली.
पोलिसांची एन्ट्री आणि समझोता
घटनेची माहिती मिळताच डायल 112 आणि महादेवा चौकीचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि जखमींना तातडीने सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. रात्रभर गावात तणावाचे वातावरण होते. शनिवारी सकाळी गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि माजी सरपंचांच्या मध्यस्थीने दोन्ही बाजूंमध्ये चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही पक्षांनी लेखी समझोता केला आणि उरलेले विधी पूर्ण करून लग्न पार पडले.
पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून दोन्ही पक्षांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ADVERTISEMENT











