Crime News : एकीकडे आनंदाचे वातावरण, केक कापण्याची तयारी आणि मित्रांचा उत्साह... पण काही क्षणातच या आनंदाचे रूपांतर किंकाळ्या आणि रक्ताच्या थारोळ्यात झाले. वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या एका 13 वर्षीय शाळकरी मुलाचा गोळी लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय?
मृत मुलाचे नाव उनैज असून तो इयत्ता सातवीत शिकत होता. सरोजिनी नगर येथील रहिवासी असलेले जमीर खान, जे विजेच्या सामानाचे दुकान चालवतात, त्यांचा उनैज हा मुलगा होता. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी उनैजचे काही मित्र त्याला घरी बोलावण्यासाठी आले होते. शेजारीच एका मित्राच्या पुतण्याच्या वाढदिवसाची पार्टी असल्याचे सांगून ते त्याला सोबत घेऊन गेले. मात्र, संध्याकाळी 6:30 च्या सुमारास उनैजच्या कुटुंबीयांना एक फोन आला आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पार्टीमध्ये गोळी चालली असून उनैज गंभीर जखमी झाल्याचे त्यांना सांगण्यात आले.
हेही वाचा : मुंबईची खबर : मुंबई-गोवा हायवेचं रखडलेलं काम लवकरच पूर्ण होणार... सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून मोठी अपडेट
कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. उनैजचे वडील जमीर खान यांनी हा अपघात नसून पूर्वनियोजित हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "माझ्या मुलाला कट रचून बोलावण्यात आले होते. संजीव त्रिपाठी नावाच्या व्यक्तीच्या पुतण्याच्या पार्टीत त्याला नेले गेले आणि तिथे त्याच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली." मुलाच्या मृत्यूमुळे संपूर्ण खान कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
पोलिस तपास आणि प्राथमिक अंदाज
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाबाबत माहिती देताना डीसीपी (मध्य) निपुण अग्रवाल यांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार हा 'ॲक्सिडेंटल फायर' म्हणजेच चुकून गोळी चालल्याचा प्रकार वाटत आहे. पार्टीमध्ये उपस्थित असलेले चारही मुले अल्पवयीन होती. खेळत असताना किंवा निष्काळजीपणामुळे बेकायदेशीर शस्त्रातून गोळी सुटली आणि ती थेट उनैजला लागली, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
पोलिसांनी तातडीने पावले उचलत पार्टीत उपस्थित असलेल्या उनैजच्या तीन अल्पवयीन मित्रांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू असून, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मुलांकडे ते बेकायदेशीर शस्त्र आले कुठून? याचा शोध पोलीस घेत आहेत. सध्या पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही हृदयद्रावक घटना उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरात घडली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











