Crime News : दिल्लीमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर सैन्यात नोकरीला असल्याचं सांगत लग्नाचं आमिष दिलं आणि फसवणूक करत बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 27 वर्षीय तरुणाने स्वतःला आर्मीचा लेफ्टनंट असल्याच सांगत सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या महिला डॉक्टरला फसवलंय. पीडितेने तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीची खरी ओळख समोर आली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सध्या त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
ADVERTISEMENT
भारतीय लष्करातील अधिकारी असल्याचं सांगितलं
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीचं नाव आरव मलिक असून तो दक्षिण दिल्लीतील छतरपूर भागात राहतो. तो एका ई-कॉमर्स कंपनीत डिलिव्हरी एजंट म्हणून काम करतो. त्याची आणि महिला डॉक्टरची ओळख सोशल मीडियावर झाली होती. संवादाच्या दरम्यान आरोपीने स्वतःला भारतीय लष्करातील अधिकारी असल्याचं सांगितलं आणि सतत संपर्क ठेवला. ही महिला डॉक्टर दिल्लीतील एका मोठ्या सरकारी रुग्णालयात कार्यरत आहे. चौकशीत उघड झालं की, आरव मलिकने दिल्ली कॅन्ट भागातील एका दुकानातून आर्मीची वर्दी खरेदी केली होती. त्याने ती युनिफॉर्म घालून घेतलेल्या फोटोंद्वारे पीडितेला फसवलं. पोलिसांच्या तपासात स्पष्ट झालं की आरोपीचा भारतीय लष्कराशी कोणताही संबंध नाही. त्याने खोटी ओळख स्वीकारली होती.
हेही वाचा : बड्या नेत्यांचे घरं सुरक्षित नाहीत, एकनाथ खडसेंच्या घरी जबरी चोरी, 6 ते 7 तोळे सोनं आणि किती रुपये नेले?
जबरदस्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले
दक्षिण-पश्चिम दिल्लीचे पोलीस उपायुक्त अमित गोयल यांनी सांगितलं की, 30 एप्रिल ते 27 सप्टेंबर दरम्यान आरोपीने डॉक्टरशी इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर सतत संवाद साधला. स्वतःला सीमारेषेवर तैनात अधिकारी असल्याचं सांगून त्याने तिचा विश्वास संपादन केला आणि भावनिकरीत्या जवळीक वाढवली. आरोपी अनेकदा डॉक्टरच्या घरीही गेला. एका वेळी त्याने तिला नशायुक्त पदार्थ खाऊ घातले. यानंतर त्याने जबरदस्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. हे प्रकरण काही दिवस सुरूच राहिलं. डॉक्टरने विरोध केला, तर आरोपी तिला धमकावत आणि ब्लॅकमेल करत असे. अखेर 16 ऑक्टोबर रोजी डॉक्टरच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 64(1) (बलात्कार), 351 (गुन्हेगारी धमकी), 319 (फसवणूक) आणि 123 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपी आरव मलिकला अटक केली. चौकशीत त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. हे प्रकरण सोशल मीडियावरील खोटी ओळख आणि विश्वासाचा गैरवापर याचं गंभीर उदाहरण मानलं जात आहे. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल आणि डिजिटल चॅट्स फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत. तसेच पोलिसांनी इशारा दिला आहे की ऑनलाइन ओळखी करताना सावधगिरी बाळगा.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











