Crime News: उत्तर प्रदेशातील बरेली येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे अॅडव्होकेट म्हणून कार्यरत असलेल्या तरुणाची पत्नी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. मात्र, पतीला आपल्या पत्नीच्या कृत्याचा हा धक्का सहन न झाल्याने त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयातील ICU मध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांच्या मते, पीडित तरुणाची प्रकृती अजूनही गंभीर आहे. तसेच, पतीने एक सुसाईड नोट लिहून आपली मुले त्याच्या पत्नीला देऊ नयेत, अशी विनंती केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
पत्नीचे दुसऱ्याच तरुणासोबत प्रेमसंबंध
संबंधित प्रकरण हे कॅन्ट पोलिस स्टेशन परिसरातील असल्याचं सांगितलं जात आहे. बरेली येथे राहणाऱ्या एका वकिलाचे सुमारे आठ वर्षांपूर्वी लग्न झालं होते. तसेच, त्याला दोन लहान मुलं असल्याची देखील माहिती आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या पत्नीचे एका दुसऱ्याच तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तिच्या कुटुंबियांनी तिला बऱ्याचदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तिने कुटुंबियांना नकार दिला. काही दिवसांपूर्वी, ती अचानक घरातून गायब झाली. तिच्या सासरच्या लोकांना वाटलं की ती तिच्या माहेरी गेली आहे, परंतु ती तिथे सुद्धा सापडली नसल्याने तिच्या पतीने तिचा शोध घेण्यास सुरूवात केली. नंतर, त्यांना कळलं की ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेली आहे. या बातमीने पतीला मोठा धक्का बसला.
हे ही वाचा: पुण्यातील 'मारणे टोळी'ची सूत्र चालवणाऱ्या रुपेश मारणेला अटक, 9 महिन्यांपासून होता फरार
खिशात एक सुसाईड नोट सापडली
आरोपी महिला पतीला सोडून दिल्यानंतर, पीडित तरुण डिप्रेशनमध्ये गेला. नैराश्यातून त्याने एके दिवशी घरी असताना विष प्राशन केलं. त्यानंतर, त्याच्या कुटुंबियांना तो बेशुद्ध अवस्थेत आढळला आणि त्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. उपचारादरम्यान, डॉक्टरांना त्याच्या खिशात एक सुसाईड नोट सापडली. त्यामध्ये असं लिहिलं होतं की, "मी आता जगू शकत नाही. जिने मला आणि माझ्या मुलांचा विश्वासघात केला, आम्हाला धोका दिला, तिच्याजवळ माझ्या मुलांना कधीच देऊ नका." ही नोट वाचल्यानंतर कुटुंबातील सदस्यांना अश्रू अनावर झाले. पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
हे ही वाचा: इंजिनिअर असलेल्या मराठी अभिनेत्याची वयाच्या 25 व्या वर्षी पंख्याला गॅळफास घेऊन आत्महत्या
पोलिसांच्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना कौटुंबिक वादातून घडल्याचं स्पष्ट होत आहे. पीडित वकिलाची पत्नी आणि तिचा प्रियकर सध्या बेपत्ता आहेत. पोलीस त्या दोघांचा शोध घेत आहेत. दरम्यान, पीडित पती सध्या रुग्णालयात दाखल असून तो जबाब देण्याच्या परिस्थितीत नसल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
ADVERTISEMENT











