Crime News : रस्त्यावर साईड देण्यास उशीर झाला या किरकोळ कारणावरुन कारमधील गुंडांनी एका ट्रक चालकाला लाठी-काठ्यांनी आणि लोखंडाच्या रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या चालकाचा बुधवारी रात्री मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे, शेकडो लोक उभे राहून हे फक्त बघत होते, पण मदतीला कोणीही पुढे आले नाही. उत्तरप्रदेशातील मथुरा महामार्गावर ही घटना घडली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : गडचिरोली: अबुजमाडच्या जंगलात नक्षलविरोधी मोठी चकमक; तीन नक्षलवादी ठार अन् एक जवान शहीद
साईड देण्यास उशीर झाल्याने मारहाण
मथुरा महामार्गावर जयगुरुदेव मंदिराजवळ मंगळवारी ही धक्कादायक घटना घडली. साईड देण्यास उशीर झाल्याच्या किरकोळ कारणावरून कारमधील गुंडांनी एका ट्रक चालकाला केबिनमधून ओढून लाठी-काठ्यांनी बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीत चालक गंभीर जखमी झाला होता, मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान बुधवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. ही घटना घडत असताना महामार्गावर शेकडो लोकांची गर्दी जमा झाली होती, पण कोणीही मदतीसाठी पुढे न येता केवळ तमाशा पाहत राहिले, ज्यामुळे माणुसकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आरोपी झाले पसार
मृत चालक अनुप यादव हा एटा जिल्ह्यातील रहिवासी असून तो आपला ट्रक घेऊन जयगुरुदेव आश्रमाजवळून जात होता. त्याच वेळी मागून येणाऱ्या बलेनो कारला वाहतूक कोंडीमुळे रस्ता मिळत नव्हता, ज्याचा राग धरून कारमधील तरुणांनी ट्रकच्या पुढे आपली गाडी आडवी लावून त्याला थांबवले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, 8 ते 10 जणांच्या टोळक्याने अनुपला केबिनमधून बाहेर ओढले आणि लोखंडी रॉड, लाठी-काठ्या तसेच विटांनी त्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. हल्लेखोर त्याला मरणासन्न अवस्थेत सोडून पसार झाले.
मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनात खळबळ माजली. एसएसपी श्लोक कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कडक कारवाईचे आदेश दिले. महामार्ग पोलिसांनी व्हायरल व्हिडिओच्या आधारे तपास चक्रावून आरोपींची ओळख पटवली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत नरहौली आणि फरह येथील रहिवासी असलेल्या योगेश, संदीप, पवन आणि लोकेंद्र या चार मुख्य आरोपींना अटक केली असून गुन्ह्यात वापरलेली बलेनो कारही जप्त केली आहे.
हे ही वाचा : सोलापूर : आधी हात जोडले, नंतर खाली बसले, शेवटी इमारतीवरुन उडी; मुलतानी बेकरीच्या मालकाने आयुष्य संपवलं
पोलिस तपास काय सांगतो?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित चालकाच्या नातेवाईकांनी मथुरा गाठल्यानंतरच या घटनेची सविस्तर माहिती समोर आली. सध्या पोलिसांनी या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून अटकेत असलेल्या आरोपींची चौकशी सुरू आहे. या घटनेतील इतर फरार हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके तैनात करण्यात आली असून, अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात आहेत.
ADVERTISEMENT











