गडचिरोली: अबुझमाडच्या जंगलात मोठी चकमक; तीन नक्षलवादी ठार अन् एक जवान शहीद
अबुजमाड परिसरातील फोदेवाडा जंगलात सुरू असलेल्या चकमकीत आतापर्यंत 3 नक्षलवादी (2 पुरुष व 1 महिला) ठार झाले असून, दुर्दैवाने सी-60 पथकाचा एक जवान शहीद झाल्याची बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अबुजमाडच्या जंगलात नक्षलविरोधी मोठी चकमक
तीन नक्षलवादी ठार अन् एक जवान शहीद
गडचिरोली: छत्तीसगड सीमेवरील अबुजमाड परिसरातील फोदेवाडा जंगलात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या चकमकीत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या धुमश्चक्रीत आतापर्यंत 3 नक्षलवादी (2 पुरुष व 1 महिला) ठार झाले असून, दुर्दैवाने सी-60 पथकाचा एक जवान शहीद झाल्याची बातमी समोर आली आहे.
नक्षल्यांचे दोन तळ उद्ध्वस्त केले...
3 फेब्रुवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास कंपनी क्रमांक 10 चे नक्षलवादी आणि छत्तीसगडमधील काही नक्षली फोदेवाडा परिसरातील जंगलात एकत्र आल्याची पोलिसांनी माहिती मिळाली. ही माहिती कळताच भामरागडच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात सी-60 पथकाच्या जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबवण्यास सुरुवात केली. 4 फेब्रुवारी रोजी दिवसा झालेल्या चकमकीत पोलिसांनी नक्षल्यांचे दोन तळ उद्ध्वस्त केल्याचं वृत्त आहे.
हे ही वाचा: मुंबई: वाटेत अडवून पॉर्न व्हिडीओ दाखवला अन् 13 वर्षीय मुलीकडे शारीरिक संबंधाची मागणी... आरोपी अटकेत
एका जवानाचा मृत्यू
त्यानंतर, 5 फेब्रुवारी रोजी सकाळपासून पुन्हा सी-60 पथक, केंद्रीय राखीव दल व जलद प्रतिसाद पथकाच्या जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबविण्यास प्रारंभ केला. यावेळी नक्षल्यांशी तुंबळ चकमक उडाली. पोलिसांनी घटनास्थळावरुन एका नक्षल्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून त्यानंतर पुन्हा दोन नक्षल्यांचे मृतदेह पोलिसांना सापडले. यात दोन पुरुष व एका महिला नक्षलीचा समावेश आहे. पोलिसांनी एक AK 47 व एक एसएलआर रायफल जप्त केल्याची माहिती आहे. मृत नक्षल्याची ओळख अद्याप पटलेली नसल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा: पुणे: "आय मिस यू दिव्यांशी..." फेसबूक लाइव्ह करत तरुणाने संपवलं जीवन! 'त्या' कारणामुळे उचललं टोकाचं पाऊल
या चकमकीत गंभीर जखमी झालेला सी-60 पथकाचा जवान दीपक चिन्ना मडावी (38) यास आज पहाटे हेलिकॉप्टरने भामरागड येथे आणण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित जवान हा मूळ मांड्रा (दामरंचा), ता.अहेरी येथील रहिवासी आहे. मात्र, उपचारादरम्यान त्याचं निधन झाले. तसेच जोगा मडावी, रा.किष्टय्यापल्ली हा जवान गोळी लागल्याने गंभीररित्या जखमी झाला. त्यालाही रुग्णालयात भरती करण्यात आलं असून, त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शहीद जवानाच्या पार्थिवाला आज दुपारनंतर गडचिरोली येथे मानवंदना देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.










