Crime News : मधू नावाच्या 22 वर्षीय विवाहितेची तिच्याच पतीने निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह त्याच्या प्रेयसीच्या भाड्याच्या खोलीतील बाथरूममध्ये लपवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मधू आणि अंकित भगत यांचे लग्न अवघ्या एका वर्षापूर्वीच झाले होते, परंतु अंकितचे दुसऱ्या एका तरुणीसोबत असलेल्या अनैतिक संबंधांमुळे त्यांच्या सुखी संसाराला गालबोट लागले. 21मे रोजी मधु अचानक बेपत्ता झाली आणि तेव्हापासूनच तिच्या माहेरच्या मंडळींनी शोधाशोध सुरू केली होती. अंकित आणि त्याच्या नातेवाईकांनी मधू दागिने घेऊन पळून गेल्याची खोटी कहाणी रचून सर्वांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र शेवटी सत्य समोर आलेच.
ADVERTISEMENT
हेही वाचा : प्रपोज केल्यानंतर तरुणीने नकार दिला, तरुणाच्या पचनी पडेना; थेट घरावर पेट्रोल बॉम्ब टाकला
शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे खुनाचा थरार उघड
मधूचे वडील अशोक यांनी अंकितवर संशय व्यक्त करून पोलिसांत धाव घेतली होती. पोलिसांनी तपास सुरू करताच अंकित 22 मे पासून गायब झाला. तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, अंकितने मानेसर बस स्टँडजवळ दोन वर्षांपासून एक खोली भाड्याने घेतली होती, जिथे तो एका तरुणीसोबत लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. 22 मे रोजी रात्री स्थानिक लोकांनी अंकित आणि त्याच्या प्रेयसीला घाईघाईने त्या खोलीतून पळून जाताना पाहिले होते. रविवारी त्या खोलीतून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बाथरूमची पाहणी केली असता, तिथे मधुचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. आरोपी पती अंकित आणि त्याची प्रेयसी या दोघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता त्यांच्या मागावर आहेत.
हेही वाचा : मित्रानं कॉफी पाजली अन् सगळं आयुष्य उद्ध्वस्त, UPSC करणाऱ्या तरुणीसोबत काय घडलं?
अंकितचे प्रेयसीसोबतचे नाते मधुच्या जीवावर बेतले
या क्रूर घटनेने मानेसर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मधुचा मृतदेह ज्या अवस्थेत सापडला, त्यावरून तिची हत्या काही दिवसांपूर्वीच झाली असल्याचे स्पष्ट होत आहे. पतीच्या या निर्दयी कृत्यामुळे माहेरच्या मंडळींना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी आता मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, आरोपींना अटक करण्यासाठी विविध ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात येत आहे. अंकितचे प्रेयसीसोबतचे हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे नाते मधुच्या जीवावर बेतले आहे. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह बाथरूममध्ये लपवून ठेवण्याचा प्रकार अत्यंत संतापजनक आहे. कायद्याचा बडगा उगारून या नराधम पतीला आणि त्याच्या प्रेयसीला लवकरात लवकर अटक केली जाईल, अशी ग्वाही पोलिसांनी दिली आहे. ही अत्यंत दुर्दैवी आणि अंगावर शहारे आणणारी घटना हरियाणातील गुरुग्राममधील मानेसर येथे घडली आहे.
ADVERTISEMENT











