Betul Cricket Bat Murder Case : मध्यप्रदेशातील बेतुलमध्ये क्रिकेटच्या मैदानातील वाद मिटवण्यासाठी गेलेल्या एका सरकारी कर्मचाऱ्याचा बॅटने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. मोहित गोहे असं 27 वर्षीय मृत कर्मचाऱ्याचं नाव असून तो गृहनिर्माण मंडळात लिपिक होता. बायकोच्या सांगण्यावरुन तो हा वाद मिटवण्यासाठी गेला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : एकाच खोलीत पाच मृतदेह आणि 3 पिस्तुल; कपाळावर गोळ्या लागलेल्या अवस्थेत आढळल्या डेथ बॉडी; संपूर्ण कुटुंब संपलं
नेमकं काय घडलं?
बेतुलच्या गंज पोलिस ठाण्यातील कट्टलधाना परिसरात क्रिकेट सामन्या दरम्यान दोन गटात वाद सुरु झाला. त्यानंतर वाद विकोपाला जाऊन दगडफेकही सुरु झाली. यामुळे मैदानात खेळणाऱ्या लहान मुलांना इजा होण्याची शक्यता होती. यामुळे तो वाद शांत करुन येण्यास मोहितला त्याच्या पत्नीने सांगितले. मोहित तिथे आला आणि परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत असताना दोन तरुणांनी त्याच्यावर हल्ला करायला सुरुवात केली. मोहितने प्रतिकार केला तेव्हा आरोपींनी त्याच्यावर बॅट आणि काठ्यांनी हल्ला केला. हल्ल्यात मोहितच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.
पत्नी देत आहे स्वत:ला दोष
या घटनेनंतर, मोहितच्या कुटुंबीयांनी त्याला ताबडतोब एका खाजगी रुग्णालयात नेले, जिथे त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला भोपाळला पाठवण्यास सांगण्यात आले. भोपाळमध्ये उपचारा दरम्यान मोहितचा मृत्यू झाला. मोहितच्या मृत्यूने त्याचे कुटुंब दुःखात बुडाले आहे. त्याचे लग्न फक्त दोन वर्षांपूर्वी झाले होते. त्याच्या मृत्यूचा दोष त्याची पत्नी स्वत:ला देत आहे. माझ्या सांगण्यावरुनच वाद मिटवण्यासाठी तो गेल्याचा आक्रोश ती करत आहे.
आरोपींवर याआधीही दाखल आहेत गुन्हे
या घटनेबाबत बैतुलचे एसपी वीरेंद्र जैन म्हणाले की, भांडणात सहभागी असलेले दीपक धुर्वे आणि पुनीत कहारे हे तरुण एकमेकांशी भांडले. मोहितने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्यावर बॅट आणि काठ्यांनी हल्ला करण्यात आला. दीपकवर यापूर्वीही हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे,तर पुनीतवरही अनेक गुन्हे दाखल आहेत. दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके तैनात करण्यात आली आहेत.
ADVERTISEMENT











