Mandar Kiwale koyta attack : पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाबाहेर भरदिवसा झालेल्या हल्ल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपी मंदार किवळे याच्यावर कोर्टाच्या बाहेर गोळीबार करत धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात मंदार किवळे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी दुपारी साधारण एक ते सव्वा एकच्या दरम्यान ही घटना घडली.
ADVERTISEMENT
हेही वाचा : पुणे : सुनावणी संपवून बाहेर येताच गेम केला! मंदार किवळेवरील क्रूर हल्ल्यामागं नेमकं कारण काय?
अधिकची माहिती अशी की, न्यायालयाच्या परिसरात नेहमीप्रमाणे पक्षकार, वकील आणि नागरिकांची वर्दळ होती. त्याचवेळी अचानक गोळीबाराचे आवाज ऐकू आले. दोन दुचाकींवरून आलेल्या हल्लेखोरांनी मंदारचा पाठलाग करत त्याच्यावर गोळीबार केला. काही गोळ्या त्याला चाटून गेल्या, तर काही गोळ्या झाडताना बंदुकीतून सुटल्या नाहीत. त्यानंतर मंदारने पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोरांनी काही अंतरावर त्याला गाठले आणि धारदार शस्त्रांनी सपासप वार करण्यास सुरुवात केली. त्याच्या डोक्यावर, पाठीवर आणि हातावर वार करण्यात आले. या हल्ल्यात त्याचा हात गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेही वाचा : Personal Finance: फ्लॅट खरेदी करताना पैसे वाचवण्याच्या भन्नाट आयडिया
शुभम चव्हाण हत्या प्रकरणाची पार्श्वभूमी
या हल्ल्यामागे 2025 मध्ये झालेल्या शुभम चव्हाण हत्या प्रकरणाची पार्श्वभूमी असल्याची माहिती समोर आली आहे. जमिनीच्या वादातून आणि वर्चस्वाच्या संघर्षातून शुभम चव्हाण याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात चार आरोपींचा समावेश होता. त्यापैकी मंदार किवळे हा एक प्रमुख आरोपी आहे. त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल असून काही दिवसांपूर्वीच त्याला जामीन मिळाला होता. या प्रकरणातील शुभम चव्हाणचा भाऊ अक्षय चव्हाण याने भावाच्या हत्येचा बदला घेण्याचे ठरवले होते, अशी माहिती समोर आली आहे. मंदार किवळे तुरुंगात असताना त्याच्यापर्यंत पोहोचणे शक्य नव्हते. मात्र, तो जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याच्यावर हल्ला करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. गुरुवारी मंदारची पुणे सत्र न्यायालयात खटल्यासंदर्भात सुनावणी होती. त्यामुळे तो न्यायालयात हजर राहण्यासाठी आला होता. याच संधीचा फायदा घेऊन त्याच्यावर हल्ला करण्याची योजना आखण्यात आल्याची माहिती आहे.
आंबेगाव परिसरात हल्ल्याचा कट रचला
मिळालेल्या माहितीनुसार, मंदार न्यायालयात येणार असल्याची माहिती अक्षय चव्हाण याला मिळाली होती. त्यानंतर त्याने बुधवारी रात्री आंबेगाव परिसरात हल्ल्याचे नियोजन केले. यासाठी 10 ते 15 जणांना सुपारी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मंदार न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर त्याच्यावर हल्ला करण्यासाठी हे हल्लेखोर दबा धरून बसले होते. दोन दुचाकींवरून आलेल्या हल्लेखोरांनी आधी गोळीबार केला आणि त्यानंतर धारदार शस्त्रांनी त्याच्यावर वार केले. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेचे काही व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरे आणि परिसरातील नागरिकांच्या मोबाइलमध्ये कैद झाले आहेत. हल्लेखोर पळून जाताना काही घोषणा देत असल्याची माहितीही समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना दौंड येथून ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. हल्ल्यातील इतर आरोपी कोण आहेत? या कटामागे आणखी कोणाचा सहभाग आहे आणि संपूर्ण नियोजन नेमके कोणी केले? याचा तपास पोलीस करत आहेत.
मंदार किवळेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती
दरम्यान, मंदार किवळेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी वार झाले असून अंतर्गत दुखापतीही झाल्या आहेत. पुढील 72 तास महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याची माहिती आहे. या घटनेमुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शिवाजीनगरसारख्या वर्दळीच्या परिसरात आणि न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ भरदिवसा गोळीबार आणि धारदार शस्त्रांनी हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. पुण्यात टोळ्यांमधील संघर्ष आणि गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश येत आहे का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. या घटनेनंतर पोलिसांच्या कामकाजावर आणि शहरातील सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील जुन्या वैमनस्यातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत असली, तरी या कटातील सर्व आरोपी आणि त्यामागील नेमकी भूमिका तपासातून स्पष्ट होणार आहे.
ADVERTISEMENT












