पुणे : .. खून करुन तो पहाटेपर्यंत डेड बॉडीजवळ बसून होता..

राहुल गायकवाड

25 Nov 2026 (अपडेटेड: 25 Nov 2026, 09:17 AM)

Pune Crime News : पुण्यातील हिंजवडीमध्ये लिव्ह-इन पार्टनर शुभम काळभांडे याने कोमल डहाके या तरुणीची हत्या केली. दुसऱ्या मुलीसोबत अफेअर असल्याच्या संशयावरून झालेल्या वादातून ही घटना घडली.

Pune Crime News

Pune Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

लिव्ह-इन पार्टनर शुभम काळभांडे याने कोमल डहाके या तरुणीची केली हत्या

point

दुसऱ्या मुलीसोबत अफेअर असल्याच्या संशयावरून वाद

Pune Crime News :  पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीची तिच्याच लिव्ह-इन पार्टनरने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोमल डहाके असं मृत तरुणीचं नाव असून शुभम काळभांडे असं आरोपीचं नाव आहे. दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होते. कोमल विप्रो कंपनीत, तर शुभम इन्फोसिस कंपनीत नोकरीला होता. गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध होते. पुण्यात नोकरीनिमित्त आल्यानंतर त्यांची ओळख झाली होती. पुढे या ओळखीचं प्रेमात रूपांतर झालं आणि दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. दोघांच्या कुटुंबीयांना त्यांच्या प्रेमसंबंधांची माहिती होती. त्यांच्या लग्नालाही दोन्ही कुटुंबांची संमती होती. लग्नाच्या दृष्टीने दोघांच्या घरात बोलणी सुरू होती. मात्र, या नात्यात संशयाने प्रवेश केला आणि त्यातूनच दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागले.

हे वाचलं का?

हेही वाचा : पुण्यात IT कंपनीत दोघंही नोकरीला, 100 ते 200 कॉल... शुभमने कोमलला संपवलं अन्.. हादरवून टाकणारी Inside स्टोरी!

दुसऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय

कोमलला शुभमचं दुसऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. याच कारणावरून ती त्याला वारंवार जाब विचारत होती. यावरून दोघांमध्ये सतत वाद होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 23 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री पुन्हा याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यादिवशी दोघेही बाहेर जेवायला गेले होते. जेवण झाल्यानंतर ते हिंजवडीतील साखरेवाडी परिसरातील प्रिस्टन पीजी येथे कोमलच्या खोलीवर परतले. याच ठिकाणी शुभमने रात्री साडेदहा ते एकच्या दरम्यान कोमलसोबत पुन्हा वाद घातला. वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. शुभमने कोमलला हाताने आणि बुक्क्यांनी मारहाण केली. तिच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर मारहाण करण्यासोबतच तिला भिंतीवर आणि बेडवरही आपटलं. या मारहाणीत कोमलचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा : 'सह्याद्रीच्या छातीत घाव घालणाऱ्यांना सोडणार नाही'; सयाजी शिंदे आक्रमक, सरकारला दिला थेट इशारा!

112 नंबरवर कॉल, पोलिसांना मैत्रीण बेशुद्ध पडल्याचं सांगितलं

मारहाणीनंतर कोमल निपचित पडली होती. सुरुवातीला ती झोपली असावी किंवा तिला चक्कर आली असावी, असं शुभमला वाटल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, काही वेळानंतर तिचा मृत्यू झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यानंतर तो पहाटेपर्यंत तिच्या मृतदेहाशेजारी बसून होता. पहाटे साडेपाचच्या सुमारास त्याने थेट 112 या पोलिसांच्या आपत्कालीन क्रमांकावर फोन केला. त्याने पोलिसांना घटनेची माहिती देत मैत्रीण बेशुद्ध पडल्याचं सांगितलं आणि रुग्णवाहिका पाठवण्याची मागणी केली. माहिती मिळताच हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कोमलला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून शुभमकडे चौकशी केली. यावेळी दोघांमध्ये वाद झाल्यानंतर आपणच तिला मारहाण केल्याची कबुली त्याने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी पोलिसांनी शुभम काळभांडे याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. सध्या तो पोलीस कोठडीत असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत. या घटनेबाबत हिंजवडी पोलिसांच्या गुन्हे शाखेतील तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांच्या प्रेमसंबंधांना आणि लग्नाला कुटुंबीयांची संमती होती. मात्र, शुभमचं दुसऱ्या मुलीसोबत अफेअर असल्याच्या संशयावरून त्यांच्यात वारंवार वाद होत होते. याच वादातून ही घटना घडल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. शुभमचे दुसऱ्या मुलीसोबत खरोखरच प्रेमसंबंध होते का, यासह या प्रकरणातील इतर बाबींचा पोलीस तपास करत आहेत. ज्या नात्याला दोन्ही कुटुंबांची संमती होती आणि जे नातं लग्नापर्यंत पोहोचलं होतं, त्या नात्याचा शेवट वाद आणि मारहाणीत झाला. या घटनेमुळे हिंजवडी परिसरात खळबळ उडाली आहे.