पुण्यात IT कंपनीत दोघंही नोकरीला, 100 ते 200 कॉल... शुभमने कोमलला संपवलं अन्.. हादरवून टाकणारी Inside स्टोरी!

श्रीकृष्ण पांचाळ

24 Nov 2026 (अपडेटेड: 24 Nov 2026, 07:28 PM)

पुण्यातील हिंजवडीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर शुभम कालबांडे याने प्रेयसी कोमल डहाळेची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 112 हेल्पलाइनवर आरोपीने स्वतः फोन केल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला.

pune hinjewadi komal dahale murder case boyfriend shubham kalabande arrested

Pune Murder Case (प्रातिनिधिक फोटो)

Google CTA

पुणे: पुण्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात प्रेमसंबंधातून एका तरुणीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली होती. आत याच हत्याकांडामागची नेमकी कहाणी ही समोर आली आहे. आरोपी प्रियकर शुभम कालबांडे यांनी प्रेयसी कोमल डहाळे हिची हत्या केली. ते दोघेही नामांकित आयटी कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर होते. रविवारी (22 नोव्हेंबर) मध्यरात्री झालेल्या वादातून शुभमने कोमलची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शुभमला अटकही करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

त्या रात्री 'नेमकं' काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री कोमल हिंजवडी येथील तिच्या पीजीमधील रूम नंबर 206 मध्ये आली होती. त्यावेळी तिची एक मैत्रीणही खोलीत होती. शुभम आणि कोमल तिथे आल्यानंतर ही मैत्रीण खोलीबाहेर गेली. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला.

हे ही वाचा>> पुणे : 'तो' संशय व्यक्त केल्यानं कोमलची हत्या, सॉफ्टवेअर इंजिनिअरने क्रूरतेचा कळस गाठला

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, कोमल मागील काही दिवसांपासून शुभमवर दुसऱ्या तरुणीशी अफेअर असल्याचं म्हणत वारंवार संशय घेत होती. याच कारणामुळे ती त्याला सतत फोन देखील करायची. कोमलने शुभमला एका दिवसात तब्बल 100 ते 200 वेळा फोन केल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.

रविवारी रात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास हा वाद विकोपाला गेला. त्यावेळी शुभमने कोमलला भिंतीवर आणि टेबलवर आपटल्याचं तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत कोमलचा मृत्यू झाला.

हत्येनंतर आरोपी शुभमनेच केला 112 नंबरवर फोन!

या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, कोमलच्या हत्येनंतर आरोपी शुभमने स्वतःच पोलिसांच्या आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक 112 वर फोन केला. सोमवारी दुपारी 12 वाजून 13 मिनिटांनी त्याने कंट्रोल रूमला फोन करून आपली प्रेयसी जखमी झाली असून तिला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेची गरज असल्याचं सांगितलं.

हे ही वाचा>> पती-पत्नीने बँकांना कोट्यवधी रुपयांचा चुना कसा लावला? आतापर्यंत किती माया जमवली?

यानंतर हिंजवडी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर खोलीतील परिस्थिती पाहून त्यांना संशय आला. शुभमची चौकशी केली असता त्याने प्राथमिक चौकशीत कोमलची हत्या केल्याची कबुली दिल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

तीन वर्ष प्रेमसंबंध

या प्रकरणात दोघांच्या प्रेमसंबंधांबाबतही वेगवेगळे दावे समोर आले आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शुभम आणि कोमल यांची ओळख नोकरी शोधण्याच्या एका अॅपद्वारे झाली होती. गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही या नात्याची माहिती होती, असा पोलिसांचा दावा आहे.

मात्र, कोमलच्या कुटुंबीयांनी हा दावा फेटाळला आहे. शुभम कोण आहे, याचीदेखील आपल्याला माहिती नव्हती. दोघांच्या प्रेमसंबंधांबाबत किंवा लग्नाबाबत कुटुंबीयांना काहीही माहीत नव्हतं, असं त्यांनी सांगितलं आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणीही कुटुंबीयांनी केली आहे.

PG च्या सुरक्षेवर कुटुंबीयांचे गंभीर प्रश्न

कोमलच्या हत्येनंतर तिच्या कुटुंबीयांनी पीजीमधील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. पीजीमध्ये सुरक्षारक्षक असतानाही एवढी मोठी घटना घडली कशी? मारहाणीच्या वेळी आरडाओरड झाली नाही का? इतर मुलींना काहीच ऐकू आलं नाही का? पीजीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे होते का? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

दरम्यान, पीजीमध्ये राहणाऱ्या काही तरुणींनी नाव न सांगण्याच्या अटीवर 'मुंबई Tak'ला सांगितलं की, शुभम आणि कोमल अनेकदा पीजीमध्ये भेटत असत. त्यांच्यात वारंवार वादही होत होते. मात्र, दोघांमधील वैयक्तिक प्रकरण असल्याने इतर मुली त्यात हस्तक्षेप करत नव्हत्या.

शुभम हा इन्फोसिसमध्ये, तर कोमल विप्रोमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होती. सध्या हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.