Latur Crime News : लातूर जिल्ह्यातील किनगाव पोलीस ठाण्यात 22 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या प्रकरणात तो आरोपी होता. पोलीस ठाण्यातच तरुणाचा मृतदेह आढळल्याने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात येणार आहे. अमित रमेश चौहान असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाची माहिती दिली.
ADVERTISEMENT
अधिकची माहिती अशी की, 21 नोव्हेंबर 2026 रोजी किनगाव पोलीस ठाण्यात 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना संबंधित मुलगी आणि आरोपी अमित हे अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर किनगाव पोलीस ठाण्याचे पथक अहिल्यानगरला रवाना झाले.
हेही वाचा : 'विधानसभा अध्यक्षांकडून आदिवासींच्या जमिनी लाटण्याचे प्रयत्न', संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मृतदेह फासाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला
पोलिसांनी अहिल्यानगर रेल्वे स्थानकावरून अल्पवयीन मुलगी आणि अमित याला ताब्यात घेतले. त्यानंतर दोघांनाही रात्री उशिरा किनगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले. अल्पवयीन मुलीच्या वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. याचदरम्यान या प्रकरणातील तपास अधिकाऱ्याने अमितला पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यातच थांबण्याची नोटीस रात्री 12 वाजता दिली होती. त्यामुळे अमित रात्री पोलीस ठाण्यातच थांबला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस ठाण्यातच अमितचा मृतदेह फासाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलीस ठाण्याच्या आवारात ही घटना घडल्याने या मृत्यूला कोठडीतील मृत्यू अर्थात कस्टोडियल डेथ मानून पुढील कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिली.
हेही वाचा : 'जिथं पाणी नाही तिथं...', अजित पवारांबाबत आनंदराज आंबेडकरांचं वादग्रस्त वक्तव्य VIDEO
पुढील तपास सीआयडीकडून केला जाणार
या घटनेनंतर राज्य सरकारच्या जून 2026 मधील परिपत्रकानुसार तातडीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या माध्यमातून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. तसेच मृतदेह लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून इन कॅमेरा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाची माहिती सीआयडी विभागालाही देण्यात आली असून, पुढील तपास सीआयडीकडून केला जाणार आहे. सध्या या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र, पुढील तपास कस्टोडियल डेथच्या नियमांनुसार केला जाणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
दरम्यान, मृत अमितचे वडील रमेश चौहान यांनी किनगाव पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. रात्री आपण पोलीस ठाण्यात गेलो होतो, त्यावेळी आपला मुलगा व्यवस्थित होता. आपण त्याला जेवणही दिले होते. मात्र, रात्रीच्या वेळेत असे काय घडले की आपल्या मुलाचा मृत्यू झाला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा द्यावी, अशी मागणी अमितच्या वडिलांनी केली आहे. पोलीस ठाण्यातच तरुणाचा मृतदेह आढळल्याने या प्रकरणाच्या तपासाकडे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT












