'विधानसभा अध्यक्षांकडून आदिवासींच्या जमिनी लाटण्याचे प्रयत्न', संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Sanjay Raut letter to Devendra Fadnavis : अलिबागमधील कातकरी आदिवासींच्या जमिनी आणि घरांवर बेकायदेशीर कब्जा केल्याचा राहुल नार्वेकर यांच्यावर संजय राऊत यांचा आरोप. या प्रकरणी राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून स्वतंत्र चौकशी आणि कारवाईची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'विधानसभा अध्यक्षांकडून आदिवासींच्या जमिनी लाटण्याचे प्रयत्न',
संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Sanjay Raut letter to Devendra Fadnavis : राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर अलिबागमधील कातकरी आदिवासींच्या जमिनी बळकावल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे.
"संवैधानिक पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने कसं वागू नये, याचं हे उत्तम उदाहरण आहे. अलिबाग तालुक्यातील आदिवासींच्या जमिनींवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून बेकायदेशीर पद्धतीने अतिक्रमण करण्यात येत असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. आदिवासी आपल्या जमीन आणि घरांसाठी आंदोलन करत असताना सरकार कुठे आहे? कोणाच्या बाजूने आहे?", असा सवाल राऊत यांनी केला आहे. संजय राऊतांनी पत्रात काय काय म्हटलंय? सविस्तर जाणून घेऊयात..
हेही वाचा : सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्टमुळे अस्वस्थ, धुळ्याच्या महिला महापौरांचा आत्महत्येचा प्रयत्न?
संजय राऊतांचं पत्र जसंच्या तसं?
देवेंद्रजी, अत्यंत व्यतीत अंतःकरणाने व आपण नक्की न्याय कराल या अपेक्षेने मी हे पत्र लिहीत आहे. संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने सार्वजनिक जीवनात वावरताना किमान मर्यादांचे पालन केले पाहिजे हे आपणही मान्य कराल. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांच्या मनमानी वर्तनाविरोधात अलिबाग तालुक्यातील आदिवासी समाज गेल्या काही काळापासून आंदोलन करीत आहे व पोलीस यंत्रणा त्या आदिवासींवर जबरदस्ती करत त्यांना पळवून लावत आहेत. हे सर्व विधानसभा अध्यक्षांच्या दबावाखाली घडत असेल तर नार्वेकर यांना त्यांच्या पदावरून तत्काळ दूर करणे गरजेचे आहे.
राहुल नार्वेकर व त्यांचे नगरसेवक बंधू मकरंद यांनी गेल्या काही काळापासून अलिबाग तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदीचा सपाटा चालवला आहे. या 'सपाट्या 'तून गरीब आदिवासींच्या जमिनीही सुटलेल्या नाहीत. म्हात्रोळी गावातील येथे कातकरी आदिवासी कुटुंबाच्या जमिनीचा बेकायदेशीर कब्जा घेऊन त्यांचे घर तोडून संपूर्ण कुटुंबाला विस्थापित करण्याचा प्रकार महाराष्ट्राच्या प्रतिमेस कलंक लावणारा आहे.
हेही वाचा : 'जर दम होता तर...', जयकुमार गोरे आणि शंभूराज देसाई यांच्यात जोरदार वादावादी
हे सर्व प्रकरण असे आहे...अलिबाग तालुका, जिल्हा रायगड येथील म्हात्रोळी गावातील कातकरी आदिवासी वाडीत पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या सुमारे २० आदिवासी कुटुंबांच्या घरांची दिनांक २४ मार्च २०२४ रोजी व त्यानंतरच्या दिवसांत बेकायदेशीर पद्धतीने तोडफोट करून त्यांना जबरदस्तीने विस्थापित करण्यात आले. सदर जमीन (गट क्रमांक १४८/१, क्षेत्र १५ एकर) फेब्रुवारी २०२४ मध्ये महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या पत्नी सौ. सरोजिनी राहुल नार्वेकर यांच्या नावे खरेदी केली.
जमिनीवर आदिवासींची घरे असल्याचे लक्षात आल्यानंतर नार्वेकर यांचे एजंट श्री. दशरथ पाटील यांनी मोठ्या जमावासह येऊन कोणतीही पूर्वसूचना न देता जेसीबीच्या सहाय्याने आदिवासींची घरे तोडली. घरातील सामान उद्ध्वस्त करून मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडून टाकण्यात आले. बोअरवेलदेखील उखडून टाकण्यात आली. तेथे आदिवासी रहात असल्याचे पुरावे अशा प्रकारे दाबून टाकले.
आदिवासी-कातकरी कुटुंबांनी आक्रोश केला तेव्हा वाडीपासून २-३ किलोमीटर अंतरावरील पर्यायी जागेत राहायला जबरदस्ती करण्यात आली. काही कुटुंबांना थोडे पैसे दिले गेले, तर काहींना काहीही दिले नाही. तुमचे तुम्ही बघा. या जमिनीवर आता आमचा कब्जा आहे असे धमकवण्यात आले. विधानसभा अध्यक्षांची ही कृती गुंड प्रवृत्तीचीच आहे.
महाराष्ट्र शासनाने ४ जानेवारी २०१७ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ही कुटुंबे त्यांच्या घराखालील जमिनीचे मालक आहेत. ही नोंद अलिबाग तहसीलदाराच्या सर्वेक्षण रेकॉर्डमध्ये आहे. या कुटुंबांकडे १५-२० वर्षांपासून घरपट्टीच्या पावत्या आहेत. यातील योजनेतून घर मिळाले होते, तेही उद्ध्वस्त करण्यात आले. हे अत्यंत निघृण आहे. घरात लहान मुले व वृद्ध महिला असताना असे वागणे हे अत्यंत निघृण आहे. या प्रकरणात पोलीस व महसूल यंत्रणेची भूमिका ही गुंडशाहिस त साथ देण्याची आहे.
आदिवासी कुटुंबांनी वारंवार तक्रार केली असतानाही पोलीस व महसूल अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल न करता धमकी देऊन त्यांच्याकडून 'आम्ही हक्क सांगणार नाही' असे लेखी घेतले. कागदावर काय लिहिले आहे हे न वाचता अंगठे घेण्यात आले. २०२५ मध्ये याबाबत राज्य मानवी हक्क आयोगाकडे दाखल केलेला दावादेखील अज्ञानी याचिकाकर्ते सुनावणीला उपस्थित न राहिल्याच्या कारणावरून एकतर्फी निकाली काढण्यात आला. सध्या ही कातकरी कुटुंबे अत्यंत दयनीय स्थितीत आहेत. पर्यायी जागेत पिण्याचे पाणी, वीज, रस्ता अशा मूलभूत सोयी नाहीत. बोअरवेलचे पाणीदेखील दूषित आहे. मालक त्यांना तेथूनही हुसकावून लावत आहेत. मुख्यमंत्री महोदय याला कायद्याचे राज्य म्हणायचे काय?
माझी आपणाकडे विनंती आहे...
१. या प्रकरणी तातडीने स्वतंत्र चौकशी करण्यात यावी.
२. श्री. दशरथ पाटील तसेच कृत्यात सहभागी झालेल्या अन्य व्यक्तींवर अत्याचार प्रतिबंधक कायदा व संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात यावा.
३. विस्थापित आदिवासी कुटुंबांना त्यांच्या मूळ जागेवर पुनर्वसन करण्यात यावे किंवा योग्य पर्यायी जागा व भरपाई मिळावी.
४. पोलीस व महसूल यंत्रणेतील अधिकाऱ्यांच्या या प्रकरणातल्या भूमिका तपासाव्यात.
आपल्या राज्यातील आदिवासींच्या जमिनी जबरदस्तीने ताब्यात घेणे व संवैधानिक पदावरील व्यक्तीचा हात त्यात असणे ही बाब गंभीर आहे. आदिवासींच्या हक्कांसाठी लढे देणाऱ्या उल्का महाजन या सातत्याने अलिबाग येथे जाऊन आंदोलन करत आहेत. प्रशासन त्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला तयार नाही. हे असेच घडत राहीले तर आंदोलनाची व्याप्ती वाढत जाईल इतकेच मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो ! आदिवासी बांधवांवर होत असलेला हा अन्याय थांबवून त्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी शासनाने स्वीकारावी, त्याचबरोबर राहुल नार्वेकर यांच्यासारख्या भूखंड बळकाऊ व्यक्ती संवैधानिक पदावर राहता कामा नयेत, ही भावना जगभावनाही समजून घ्यावी.
