Retired RTO officer hemant hemade suicide case , नाशिक : नाशिकमधील सिटी सेंटर मॉल परिसरातील उषा किरण सोसायटीमध्ये निवृत्त RTO अधिकाऱ्याने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हेमंत गोविंद हेमाडे असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. कौटुंबिक वाद आणि मालमत्तेच्या वादातून गेल्या पाच वर्षांपासून त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता, असा आरोप त्यांच्या दुसऱ्या पत्नीने केला आहे.
ADVERTISEMENT
'तीच तुमच्या दोघांची शेवटची तारीख असेल', कोणी दिली धमकी?
'न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहिलास तर तीच तुमच्या दोघांची शेवटची तारीख असेल,' अशी धमकी त्यांना देण्यात आल्याचा दावा त्यांच्या दुसऱ्या पत्नीने केला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी हेमाडे यांच्या मुलासह मुलगी, सून आणि व्याह्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा : घटस्फोटावेळचा 'तो' टी-शर्ट पाठ सोडेना; प्रियांका चतुर्वेदींच्या 'गुगली'वर युजवेंद्र चहल क्लीन बोल्ड!
बंगल्यासह इतर स्थावर मालमत्तेवरून वाद
हेमंत गोविंद हेमाडे हे राज्य परिवहन विभागात RTO अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी आपल्या सेवाकाळात गडचिरोली आणि चंद्रपूर या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये काम केले होते. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी परवानाधारक पिस्तुलासाठी अर्ज केला होता. शासनाकडून त्यांना त्याची परवानगीही मिळाली होती. डिसेंबर 2025 मध्ये ते सेवेतून निवृत्त झाले होते. त्यानंतर ते नाशिकमधील गंगापूर रोड परिसरातील उषा किरण सोसायटीमधील स्वतःच्या बंगल्यात दुसरी पत्नी योगिता यांच्यासोबत राहत होते. हेमाडे यांच्या पहिल्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. पहिल्या पत्नीपासून त्यांना यश नावाचा मुलगा आणि प्रियंका नावाची मुलगी आहे. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर सुमारे 15 वर्षांपूर्वी त्यांनी योगिता यांच्याशी दुसरा विवाह केला. मात्र, हा विवाह पहिल्या पत्नीच्या मुलांना मान्य नव्हता. त्यानंतर कुटुंबात वाद सुरू झाल्याचा आरोप आहे.
हेही वाचा : Solapur Drought | पाण्यासाठी 300 फूट खोल बोगद्यात उतरले शेतकरी; राजेंद्र राऊत यांच्यावर थेट आरोप
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, हेमाडे यांच्या नाशिकमधील बंगल्यासह इतर स्थावर मालमत्तेवरून वाद सुरू होता. मुलगा यश आणि मुलगी प्रियंका यांनी दुसऱ्या पत्नी योगिता यांना मालमत्तेतील हक्क सोडण्यास सांगण्यासाठी वडिलांवर दबाव टाकल्याचा आरोप आहे. 8 ऑक्टोबर 2021 पासून 20 नोव्हेंबर 2026 पर्यंतच्या कालावधीत हेमाडे यांची फसवणूक करून त्यांची काही मिळकत बळकावण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याविरोधात हेमाडे यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. मात्र, हा दावा आणि इतर प्रकरणे मागे घेण्यासाठी त्यांना वारंवार धमकावण्यात आल्याचा आरोप आहे. 'यापुढे न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहिलास तर पती-पत्नी दोघांसाठी तीच शेवटची तारीख असेल,' अशी धमकी देण्यात आल्याचे योगिता यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकारामुळे हेमाडे यांचा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
गुरुवारी रात्री उशिरा हेमाडे घरी परतले होते. मध्यरात्री दोनच्या सुमारास त्यांच्या खोलीतून मोठा आवाज आल्याने पत्नी आणि मुलीने खोलीकडे धाव घेतली. त्यावेळी हेमाडे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेनंतर गंगापूर पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. त्यांचे परवानाधारक पिस्तूल जप्त करण्यात आले होते. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट आढळली नव्हती. त्यानंतर पत्नी योगिता यांनी दिलेल्या सविस्तर तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ३५१(२)(३) आणि इतर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये मुलगा यश हेमंत हेमाडे, सून भाग्यश्री यश हेमाडे, मुलगी प्रियंका कुणाल खोपकर आणि यशचे सासरे मल्लिकार्जुन उमदी यांचा समावेश आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून गंगापूर पोलीस पुढील तपास करत आहेत.
ADVERTISEMENT












