Crime News : नववीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी विद्यार्थिनीने आपल्या हातावर मेहंदीने प्रियकराचे नाव लिहिले होते. मात्र, हे नाव कायमस्वरूपी राहावे म्हणून तिने ब्लेडने त्याच नावावर जखमा केल्याचे समोर आले आहे. ही घटना शुक्रवारी (20 नोव्हेंबर) रात्री गावात घडली. संबंधित विद्यार्थिनी कबड्डीपटू होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमधील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
लग्न समारंभातून आई आली अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री गावातील एका घरात लग्नसमारंभ होता. त्यामुळे विद्यार्थिनीच्या कुटुंबातील सर्वजण लग्नासाठी गेले होते. दरम्यान, रात्री उशिरा विद्यार्थिनी लग्नसमारंभातून घरी परतली आणि आपल्या खोलीत गेली. लग्नसमारंभ आटोपल्यानंतर तिची आई घरी आली. तिने बराच वेळ दरवाजा ठोठावला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर खिडकीतून डोकावून पाहिले असता मुलगी पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. हे दृश्य पाहून आईला मोठा धक्का बसला. शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून पोलिसांना माहिती देण्यात आली.
हे ही वाचा : राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन, मराठवाड्यावर शोककळा
हातावर ब्लेडने लिहिले नाव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीच्या हातावर मेहंदी आणि ब्लेडने तिचा प्रियकर अनुपम याचे नाव लिहिलेले होते. अनुपम हा नौडिहवा गावातील रहिवासी असून तो त्याच विद्यार्थिनीसोबत कोचिंग क्लासला जात होता. गेल्या वर्षभरापासून दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांनाही लग्न करायचे होते; मात्र त्यांच्या नात्याला कुटुंबीयांचा विरोध होता. या विरोधामुळे विद्यार्थिनीने यापूर्वीही एक-दोन वेळा हाताची नस कापण्याचा प्रयत्न केल्याचे चौकशीत समोर आले आहे.
हे ही वाचा : ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवताय? पुण्यात FDA च्या कारवाईत काय सापडलं बघाच!
मोबाईलमध्ये काय सापडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे झाला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून विद्यार्थिनीचा मोबाईल फोनही जप्त केला आहे. हा मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. सध्या पोलीस कॉल डिटेल्स रिपोर्ट (CDR) आणि शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करत आहेत. हे अहवाल आल्यानंतरच विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल का उचलले, यामागचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
ADVERTISEMENT












