सोलापूर : प्रसाद म्हणून दिलेली चिक्की खाणं पडलं महागात, रेल्वेत महिलेने दांपत्याचा गेम कसा केला?

विजयकुमार बाबर

21 Nov 2026 (अपडेटेड: 21 Nov 2026, 10:19 AM)

रेल्वेत प्रसादाच्या नावाखाली चिक्की खायला देऊन लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी उत्तर प्रदेशातील एका महिलेला अटक केली आहे.

Solapur Crime

Solapur Crime

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

कर्नाटक सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये धक्कादायक प्रकार

point

चिक्की खायला देऊन चोरी

Solapur Crime : कर्नाटक सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या दांपत्याला प्रसादाच्या नावाखाली चिक्की देऊन लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने चिक्कीमध्ये गुंगीकारक पदार्थ मिसळून दांपत्याला खायला दिली. चिक्की खाल्ल्यानंतर दोघांनाही गुंगी आली. याच संधीचा फायदा घेत महिलेने महिलेच्या गळ्यातील 50 ग्रॅम वजनाचे आणि तब्बल 1 लाख 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. या प्रकरणी सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी गीतादेवी ऊर्फ मीनादेवी रामनरेश थोरे (वय 59, रा. इटावा, उत्तर प्रदेश) या महिलेला अटक केली आहे.

हे वाचलं का?

प्रवासात नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, 15 सप्टेंबर 2026 रोजी गोविंद कुमरा आणि त्यांची पत्नी कोपरगाव ते मंत्रालय असा रेल्वेने प्रवास करत होते. यावेळी त्यांची ओळख एका महिलेशी झाली. या महिलेने दांपत्याचा विश्वास संपादन करून त्यांना प्रसाद असल्याचे सांगत चिक्की खाण्यास दिली. चिक्की खाल्ल्यानंतर काही वेळातच दोघांनाही गुंगी आली. त्यानंतर महिलेने त्यांच्या असहायतेचा फायदा घेत सोन्याचे मंगळसूत्र चोरले आणि तेथून पळ काढला.

हे ही वाचा : सोलापूर : नातवांच्या वेगळ्या वाटा! गणपतराव देशमुखांच्या नातवांमध्ये राजकीय संघर्ष?

सराईत गुन्हेगार, विविध ठिकाणी गुन्हे दाखल

या घटनेनंतर सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपी महिला छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने गेल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानुसार पोलिसांनी 16 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौक परिसरातून तिला ताब्यात घेऊन अटक केली. ही महिला सराईत गुन्हेगार असून तिच्याविरुद्ध छत्रपती संभाजीनगर, कल्याण लोहमार्ग, दादर लोहमार्ग आणि मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यांत यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.

हे ही वाचा : महायुतीत भाजपकडून ‘केसाने गळा कापण्याचा’ प्रयत्न! राजेंद्र गावितांचा गंभीर आरोप

चिक्कीत नेमकं काय मिसळलं?

दरम्यान, न्यायालयाने आरोपी महिलेला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. चिक्कीमध्ये नेमका कोणता गुंगीकारक पदार्थ मिसळण्यात आला होता आणि या चोरीमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. पोलीस उपनिरीक्षक शब्बीर तांबोळी या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. प्रसादाच्या नावाखाली प्रवाशांचा विश्वास संपादन करून त्यांना लुटण्याच्या या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासादरम्यान अनोळखी व्यक्तींनी दिलेले खाद्यपदार्थ किंवा पेय स्वीकारताना खबरदारीचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.