कणकवली : मुलीची मासिक पाळी चुकली अन् पालकांना संशय, AI च्या मदतीने आरोपीचं कांड!

सुमित भुजबळ

• 07:44 AM • 20 Nov 2026

Sindhudurg Crime News : इन्स्टाग्रामवर ‘मंथन’ नावाने बनावट अकाउंट तयार करून 17 वर्षांचा असल्याचे भासवणाऱ्या 39 वर्षीय विवाहित व्यक्तीला सिंधुदुर्ग पोलिसांनी अटक केली. एआयच्या मदतीने चेहरा बदलून आरोपीने 14 वर्षीय मुलीची फसवणूक केल्याचा आणि सात महिने तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.

Sindhudurg Crime News

Sindhudurg Crime News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

कणकवली : मुलीची मासिक पाळी चुकली अन् पालकांना संशय

point

AI च्या मदतीने आरोपीचं कांड!

Sindhudurg Crime News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात एआयचा वापर करून बनावट ओळख निर्माण करत एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इन्स्टाग्रामवर ‘मंथन’ नावाने अकाउंट तयार करून स्वतःचे वय 17 वर्षे असल्याचे भासवणारा व्यक्ती प्रत्यक्षात 39 वर्षांचा विवाहित असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले. महेंद्र गणपत घाडीगांवकर असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. 

हे वाचलं का?

आरोपीने एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वतःचे फोटो एडिट करून चेहऱ्यावरील वयस्करपणा लपवला होता. त्यानंतर मित्राच्या नावावर असलेल्या सिमकार्डचा वापर करून त्याने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार केले. कणकवली तालुक्यातील एका शाळेत नववीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीशी जानेवारी 2026 मध्ये त्याची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. आपण 17 वर्षांचे असून कणकवलीतील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याचे त्याने मुलीला सांगितले. 

हेही वाचा : गोंदिया : एअर होस्टेसच्या हत्येचा धक्कादायक उलगडा; प्रेमसंबंधाला वैतागून 13 लाखांची सुपारी, मास्टरमाईंड कोण?

प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप

सुरुवातीला साधे संभाषण आणि त्यानंतर नियमित चॅटिंगमधून त्याने मुलीचा विश्वास संपादन केला. या बनावट ओळखीच्या आधारे मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. मालवण तालुक्यातील किर्लोस गावच्या गावठाण परिसरात राहणारा महेंद्र घाडीगांवकर विवाहित असून त्याला एक मुलगी आहे. त्याची पत्नी मुलीसह मुंबईत राहते, तर महेंद्र गावी मोलमजुरीची कामे करतो. त्याने स्वतःच्या नावाने एक आणि ‘मंथन’ नावाने दुसरे इन्स्टाग्राम अकाउंट तयार केले होते. बनावट अकाउंटसाठी स्वतःचे सिमकार्ड न वापरता त्याने मित्राच्या नावावरील सिमकार्ड वापरले. 

हेही वाचा : नांदेड : 'मारोती दारात विळा घासतोय', आईचा मुलाला फोन; पण घरी येईपर्यंत...

मुलीची मासिक पाळी चुकल्यानंतर पालकांना संशय

जानेवारीमध्ये सुरू झालेली ऑनलाइन मैत्री जुलै 2026 पासून प्रत्यक्ष भेटींपर्यंत पोहोचली. कणकवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असरोंडी गावात रस्त्यापासून सुमारे 300 मीटर आत असलेल्या जंगलमय परिसरात या भेटी होत असल्याचे तपासात समोर आले आहे. मुलगी घरातून वेगवेगळी कारणे सांगून शाळेच्या वेळेपूर्वी बाहेर पडत असे. त्यानंतर महेंद्र मोटारसायकलवरून तेथे पोहोचत असे आणि तिला दुचाकीवरून संबंधित ठिकाणी घेऊन जात असे. जुलै ते 5 नोव्हेंबर 2026 या कालावधीत हा प्रकार सुरू असल्याचे तपासात निष्पन्न झाले. मुलीची मासिक पाळी चुकल्यानंतर पालकांना संशय आला. त्यांनी तिच्याकडे विचारपूस केली असता इन्स्टाग्रामवरील ‘मंथन’ नावाच्या व्यक्तीची माहिती समोर आली. मुलीने निळ्या रंगाची मोटारसायकल आणि एआयच्या मदतीने एडिट केलेल्या फोटोबाबतही सांगितले.

यानंतर 15 नोव्हेंबर 2026 रोजी पीडित मुलीने कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनास्थळ कणकवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने पुढील तपासासाठी हे प्रकरण कणकवली पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे यांनी तपास सुरू केला. सर्वप्रथम ‘मंथन’च्या इन्स्टाग्राम अकाउंटशी संबंधित मोबाईल क्रमांकाचा माग काढण्यात आला. मात्र, हा क्रमांक दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी संबंधित व्यक्तीकडे चौकशी केली असता हे सिमकार्ड त्याचा मित्र महेंद्र घाडीगांवकर वापरत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मालवण तालुक्यातील किर्लोस येथील महेंद्रच्या राहत्या घरातून त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला महेंद्रने या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचे सांगत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. ‘मंथन’ आणि आणखी दोन नावांचे आपले मित्र असल्याचे सांगून मंथन कोल्हापूरमध्ये राहत असल्याचा दावा त्याने केला. मात्र, महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे यांनी महेंद्रचा फोटो पीडित मुलीला दाखवला. तो फोटो पाहताच मुलीने हाच व्यक्ती ‘मंथन’ असल्याचे ओळखून सांगितले. त्यानंतर पोलिसांच्या तपासात बनावट ओळखीमागील खरे वास्तव समोर आले. महेंद्रच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते.