Crime News : नातेसंबंधातून घडलेल्या हत्येच्या एका धक्कादायक घटनेचा उलगडा झाला आहे. एका महिला हेड कॉन्स्टेबलने आपल्या प्रियकराची म्हणजेच पोलीस विभागात कार्यरत असलेल्या एएसआयची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तीन साथीदारांच्या मदतीने पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह कारमध्ये ठेवून पेटवून दिला. अल्फाबेन केलासवा (वय 37) असे आरोपी महिला हेड कॉन्स्टेबलचे नाव असून अश्विनभाई तबियाड (वय 45) असे मृत एएसआयचे नाव आहे. दोघेही गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यातील चिथोडा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते; मात्र अलीकडे या संबंधांवरून त्यांच्यात वाद सुरू होते.
ADVERTISEMENT
महिला कॉन्स्टेबलने कसा रचला कट?
पोलिसांच्या माहितीनुसार, अल्फाबेनला अश्विनसोबतचे संबंध संपवायचे होते. मात्र अश्विन हे नाते कायम ठेवण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत होते. याच कारणावरून दोघांमध्ये तणाव वाढला होता. 8 नोव्हेंबरच्या रात्री अल्फाबेनने अश्विन यांना आपल्या भाड्याच्या घरात बोलावले. याच ठिकाणी त्यांची हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. दुसऱ्या दिवशी अल्फाबेनने आपला भाऊ कल्पेश आणि चुलत भाऊ पंकज यांना मदतीसाठी बोलावले. तिघांनी मिळून अश्विन यांचा मृतदेह गोणीत भरून दिवसभर घरात लपवून ठेवला.
हे ही वाचा : ‘माझ्याशी लग्न कर, अन्यथा फोटो व्हायरल करतो’, 18 वर्षीय तरूणी अक्षरश: वैतागली; अन्...
जंगलात काय घडलं?
यानंतर अश्विन यांची मारुती अर्टिगा कार जंगलाच्या दिशेने नेण्यात आली. त्यानंतर कल्पेश आणि त्याचा मित्र मनोजकुमार यांनी पेट्रोल पंपावरून पेट्रोल आणले. हथमती नदीजवळील निर्जन ठिकाणी कारमध्ये ठेवलेल्या मृतदेहावर आणि कारवर पेट्रोल ओतून आग लावण्यात आली. मात्र, आग लावताना आगीच्या ज्वाळा अचानक भडकल्या आणि अल्फाबेनच्या चेहऱ्यासह हातांवर व शरीराच्या इतर भागांवर भाजल्याच्या जखमा झाल्या. तिने त्यानंतर रुग्णालयात उपचार घेतले. याच जखमा पोलिसांच्या तपासातील महत्त्वाचा पुरावा ठरल्या.
हे ही वाचा : पतीला सोडायला लावलं, लग्नाचं स्वप्न दाखवलं; 8 महिन्यांनी परदेशी विद्यार्थ्याचा खरा चेहरा उघड!
कसे सापडले आरोपी?
दरम्यान, 10 नोव्हेंबर रोजी भिलोडा परिसरात पूर्णपणे जळालेली कार आढळल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. कारमधून मानवी सांगाडा मिळाल्यानंतर सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, मृताच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्यानंतर 16 नोव्हेंबरला हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रकरणाचा उलगडा केला. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणीची प्रक्रियाही सुरू करण्यात आली. या प्रकरणी अल्फाबेनसह कल्पेश, पंकज आणि मनोजकुमार अशा चौघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT












