Beed Crime : बीड जिल्ह्यातील वाणगावमधून एक अत्यंत अंगावर काटा आणणारी आणि मानवी संवेदनेला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जुनी दुचाकी खरेदी करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातून बीडमध्ये आलेल्या दोन मित्रांसोबत एक भयंकर प्रकार घडला. चोरीच्या संशयावरून या दोन निरपराध युवकांना स्थानिकांनी एवढा अमानुष त्रास दिला की, यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT
ट्रॅक्टरला बांधलं अन्...
दुचाकी व्यवहारासाठी आलेल्या या तरुणांवर थेट चोरीचा संशय घेत काही नराधमांनी घेरले. त्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि पट्ट्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता या अमानुषतेचा कळस गाठत त्या दोन्ही मित्रांना एका ट्रॅक्टरला घट्ट बांधून ठेवण्यात आले. या अमानूष व क्रूर वागणुकीमुळे दोन्ही तरुण गंभीररीत्या जखमी झाले.
हे ही वाचा : धावत्या वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये एकच खळबळ अन्...
एका तरुणाचा मृत्यू
या अमानुष मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या युवकांपैकी संभाजी सारूक नावाच्या धाराशिवच्या तरुणाची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. या धक्कादायक घटनेमुळे बीडसह संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमधून संतापाची लाट उसळली आहे. नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकाराने पुन्हा एकदा कायद्याच्या भीतीचा अभाव आणि वाढत्या हिंसेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
हे ही वाचा : मुंबई : लोकल ट्रेन सुरु झाली अन् नाशिकच्या तरुणाने फेकून मारला चाकू, पुढं काय घडलं?
पाच जणांविरोधात गुन्हा
मृत तरुणाच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून नेकनूर पोलिसांनी तातडीने कठोर पावले उचलत तब्बल पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे, तर एका आरोपीची ओळख पटवणे अजून बाकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून या नराधमांना कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
ADVERTISEMENT












