Jalna News dualat maharaj satpute death case : जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध कीर्तनकार आणि पाताळेश्वर संस्थानाचे मठाधिपती ह.भ.प. देवेंद्र चैतन्य स्वामी उर्फ दौलत महाराज सातपुते यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. स्वामींचा मृतदेह राहत्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर घटनास्थळावरून त्यांचा मोबाईल गायब असल्याचे समोर आले होते. पोलिसांकडून या मोबाईलचा शोध सुरू होता. अखेर पोलिसांना हा मोबाईल मंदिर परिसरातील विहिरीत आढळून आला आहे. घटनास्थळापासून साधारण 40 फूट अंतरावर असलेल्या विहिरीत हा मोबाईल सापडला. त्यामुळे स्वामींच्या मृत्यू प्रकरणातील गूढ अधिकच वाढले आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : पंढरपूर हादरले, शिवा संघटनेच्या अध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या, वर्दळीच्या ठिकाणी बेछूट गोळीबार
गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला
प्राचीन पाताळेश्वर संस्थानचे देवेंद्र चैतन्य स्वामी हे मठाधिपती होते. शनिवारी रात्री सुमारे 10 वाजेपर्यंत त्यांचे गावात कीर्तन झाले होते. त्यानंतर ते नेहमीप्रमाणे मठात परतले होते. रविवारी सकाळी बराच वेळ होऊनही स्वामी मंदिरात आले नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांनी त्यांच्या राहत्या खोलीत जाऊन पाहणी केली. त्यावेळी खोलीतील स्लॅबच्या कडीला भगव्या रंगाच्या रुमालाच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
हेही वाचा : पंढरपूर हादरले, शिवा संघटनेच्या अध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या, वर्दळीच्या ठिकाणी बेछूट गोळीबार
मोबाईल मंदिर परिसरातील विहिरीत आढळून आला
या घटनेनंतर स्वामींचा मोबाईल घटनास्थळावरून गायब असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे पोलिसांनी मोबाईलचा शोध सुरू केला. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांना हा मोबाईल घटनास्थळापासून साधारण 40 फूट अंतरावर असलेल्या मंदिर परिसरातील विहिरीत आढळून आला. सध्या हा मोबाईल बंद अवस्थेत आहे. त्यामुळे त्याची तांत्रिक तपासणी केली जाणार आहे. स्वामींच्या मोबाईलमधील माहिती या तपासासाठी महत्त्वाची ठरू शकते. त्यांच्या मोबाईलवर शेवटचे फोन कोणाचे आले होते, त्यांनी शेवटचे कोणाशी संभाषण केले होते, याची माहिती पोलीस मिळवण्याचा प्रयत्न करणार आहेत.
दरम्यान, मोबाईलमधील इतर माहितीच्या आधारेही पोलीस तपास करणार आहेत. स्वामींचा मोबाईल विहिरीत नेमका कसा पोहोचला? यासह या प्रकरणाशी संबंधित इतर बाबींचा तपास केला जाणार आहे. पारध पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मोबाईलच्या तांत्रिक तपासणीतून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागतात का? स्वामींना शेवटचे फोन कोणी केले होते आणि त्यांच्या मृत्यूपूर्वी कोणाशी संभाषण झाले होते? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. मोबाईलमधून समोर येणाऱ्या माहितीच्या आधारे देवेंद्र चैतन्य स्वामी यांच्या मृत्यूचे गूढ उलगडते का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT












