‘माझ्याशी लग्न कर, अन्यथा फोटो व्हायरल करतो’, 18 वर्षीय तरूणी अक्षरश: वैतागली; अन्...

विजयकुमार बाबर

• 01:44 PM • 19 Nov 2026

सोलापूर तालुक्यातील नांदणी येथे लग्नासाठी दबाव आणि खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या धमक्यांना कंटाळून 18 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

solapur crime news 18 year old girl end of life case marriage threat private photos case

18 वर्षीय तरुणीची आत्महत्या

Google CTA

सोलापूर: तरुणाकडून लग्नासाठी सतत तगादा लावला जात असल्याने आणि लग्नास नकार दिल्यास फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली जात असल्याच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका १८ वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूर तालुक्यातील नांदणी येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हे वाचलं का?

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी घरी एकटी असताना एक तरुण तिच्या घरी येत होता. ‘माझ्याशी लग्न करायचे, नाहीतर तुझे फोटो व्हायरल करतो,’ अशी धमकी देत तो तिच्याकडे सतत लग्नासाठी तगादा लावत होता. लग्नासाठी दबाव टाकण्याबरोबरच फोटो व्हायरल करण्याच्या धमक्यांमुळे तरूणी मानसिक तणावाखाली होती. या सततच्या त्रासाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.

हे ही वाचा>> मध्यरात्री शेतात गेली महिला, प्रियकरासमोर बाळाला जन्म दिला अन् पुढं घडला भयंकर प्रकार

दरम्यान, 17 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास तरुणी घरी असताना तिने राहत्या घरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेतला. ही घटना निदर्शनास आल्यानंतर नातेवाईकांनी तातडीने तिला गळफासावरून खाली उतरवले. त्यानंतर रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास तिच्या मामांनी तिला सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

या प्रकरणी मृत तरुणीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली असून, रविकांत सुरवसे या तरुणाकडून लग्नासाठी तगादा लावला जात होता आणि लग्नास नकार दिल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली जात होती, असा आरोप करण्यात आला आहे. या धमक्या आणि मानसिक त्रासामुळेच तरुणीने आत्महत्या केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

हे ही वाचा>> पतीला सोडायला लावलं, लग्नाचं स्वप्न दाखवलं; 8 महिन्यांनी परदेशी विद्यार्थ्याचा खरा चेहरा उघड!

अवघ्या 18 वर्षांच्या तरुणीने अशा प्रकारे जीवन संपवल्याने नांदणी परिसरात शोककळा पसरली आहे. तरुणींना धमकावणे, खासगी फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवून लग्नासाठी दबाव टाकणे, अशा प्रकारांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून, संशयितावरील आरोपांची सत्यता तपासानंतर स्पष्ट होणार आहे.