Crime News : माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधातून जन्मलेल्या अवघ्या एक दिवसाच्या नवजात मुलीची गळा आवळून हत्या केल्याप्रकरणी 21 वर्षीय आई आणि तिच्या 32 वर्षीय प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. एका शेतातील नाल्यात ही नवजात मुलगी गंभीर अवस्थेत आढळली होती. तिला तातडीने गांधीनगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात मुलीचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. गुजरातमधील गांधीनगर जिल्ह्यात ही घटना घडली.
ADVERTISEMENT
चार वर्षांपासून प्रेमसंबंध
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचे सुमारे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र, पतीसोबत मतभेद झाल्याने ती गेल्या दीड वर्षापासून माहेरी राहत होती. याचदरम्यान तिचे कालाजी नावाच्या 32 वर्षीय व्यक्तीसोबत गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. विशेष म्हणजे, या व्यक्तीचेही लग्न झाले असून तोदेखील पत्नीपासून वेगळा राहत होता. या दोघांच्या संबंधातून महिलेला यापूर्वी दोन वेळा गर्भधारणा झाली होती. मात्र, दोन्ही वेळा त्यांनी गर्भपात केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
हे ही वाचा : पतीला सोडायला लावलं, लग्नाचं स्वप्न दाखवलं; 8 महिन्यांनी परदेशी विद्यार्थ्याचा खरा चेहरा उघड!
शेतात दिला बाळाला जन्म
तिसऱ्यांदा गर्भधारणा झाल्यानंतर मात्र महिलेला बराच काळ याची माहिती कुटुंबीयांपासून लपवून ठेवण्यात यश आले. प्रियकराने गर्भपात करण्यासाठी तिला काही गोळ्या दिल्या होत्या. मात्र, त्याचा परिणाम झाला नाही. डॉक्टरांकडे गेल्यास गर्भधारणेचे सत्य समोर येईल, या भीतीने महिलेने कुटुंबीयांनाही याबाबत काही सांगितले नाही. 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्री तिला प्रसूतीकळा सुरू झाल्या. शौचास जाण्याचे कारण सांगून ती घराबाहेर पडली आणि गावाबाहेरील शेतात गेली. तिथे प्रियकराच्या उपस्थितीत तिने एका मुलीला जन्म दिला.
हे ही वाचा : महाराष्ट्रातील 282 अग्निवीरांच्या भरतीला केंद्र सरकारचा ब्रेक; आता राज्यात नोकरी कधी मिळणार?
प्रेमसंबंध उघड होतील म्हणून...
जन्मानंतर नवजात मुलगी रडू लागली. आपले प्रेमसंबंध आणि बाळाच्या जन्माचे सत्य उघड होईल, या भीतीने महिलेने मुलीचा गळा आवळून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिने नवजात मुलीला शेतातील नाल्यात फेकून दिले. गंभीर अवस्थेत आढळलेल्या या बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवाल आणि पोलिस तपासानंतर आईसह तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास देहगाम पोलिस करत आहेत.
ADVERTISEMENT












