Nanded Crime News : मुखेड तालुक्यातील हसनाळ येथे कौटुंबिक वादातून एका महिलेचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. 17 नोव्हेंबर रोजी रात्री ही घटना उघडकीस आली. लक्ष्मीबाई गदले असे मृत महिलेचे नाव आहे. घरातच त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. या घटनेमुळे हसनाळ परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी मारोती याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. लक्ष्मीबाई यांचे दोन्ही मुलं कामानिमित्त पुण्यात राहत होते. घराच्या वास्तुशांती कार्यक्रमानिमित्त मुलगा दीपक याच्याशी त्यांचा फोनवरून संपर्क झाला होता. याच संभाषणातून आईने मारोतीसोबत झालेल्या वादाची माहिती मुलाला दिली होती.
ADVERTISEMENT
हेही वाचा : पोलीस उपनिरीक्षक महिला हेड कॉन्स्टेबलच्या प्रेमात आकंठ बुडाला, शेवटी जंगलात सापडला सांगाडा
कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती
अधिकची माहिती अशी की, 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी लक्ष्मीबाई यांनी मुलगा दीपक याला फोन करून मारोतीसोबत झालेल्या वादाबाबत सांगितले होते. रात्री पुन्हा फोनवर संपर्क साधला असता मारोती विळा घासत असल्याचे त्यांनी मुलाला सांगितले. तसेच घरातील देव्हारा उचलून फेकून दिल्याची माहितीही दिली. यावेळी मारोतीपासून आपल्याला धोका असल्याची भीती लक्ष्मीबाई यांनी व्यक्त केली होती. या संभाषणाचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. दरम्यान, रात्री सुमारे 10 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास दीपक हा सासरवाडी बळेगाव येथून हसनाळमधील घरी पोहोचला. मात्र, घराच्या दरवाजाला आतून कडी लावलेली होती. त्यामुळे त्याने खिडकीतून घरात डोकावून पाहिले.
हेही वाचा : WhatsApp वर 'Hi' लिहा अन् एक झटक्यात समोर येईल तुमचा PF बॅलन्स!
पोलिसांनी आरोपी मारोतीला ताब्यात घेतले
त्यावेळी मावसभाऊ मारोती याच्या हातात विळा आणि कुऱ्हाड असल्याचे दीपकला दिसले. घरातील फरशीवर आई लक्ष्मीबाई रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्या कोणतीही हालचाल करत नव्हत्या. ही परिस्थिती पाहून नातेवाईक आणि गावातील नागरिकांनी मारोती यानेच लक्ष्मीबाई यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला. त्याने लक्ष्मीबाई यांच्या गळ्यावर, मानेवर आणि डोक्यावर विळ्याने वार करून त्यांचा खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र, घराचे दार आतून बंद असल्याने नागरिकांना तातडीने आत प्रवेश करता येत नव्हता. त्यामुळे गावातील नागरिकांनी डायल 112 वर संपर्क साधून पोलिसांना घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. घरातील परिस्थितीची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी आरोपी मारोती याला ताब्यात घेतले. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक तपशील समोर आला आहे. लक्ष्मीबाई यांनी घटनेच्या काही तास आधीच मुलगा दीपक याच्याशी फोनवर बोलताना मारोतीपासून धोका असल्याची भीती व्यक्त केली होती. त्यानंतर रात्री त्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्या. या घटनेमुळे हसनाळ गावात खळबळ उडाली असून महिलेच्या मृत्यूने परिसरात चर्चा सुरू आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
ADVERTISEMENT












