गोंदिया : एअर होस्टेसच्या हत्येचा धक्कादायक उलगडा; प्रेमसंबंधाला वैतागून 13 लाखांची सुपारी, मास्टरमाईंड कोण?
एअर इंडियाच्या महिला कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अनैतिक संबंधातून हत्या
एअर इंडियाच्या महिला कर्मचाऱ्याला कोणी संपवलं?
पोलीस तपासात धक्कादायक उलगडा
Varsha Turkar Murder Case : दिवाळीच्या सुट्ट्यांसाठी माहेरी आलेल्या पुणे विमानतळावरील एअर इंडियाच्या महिला कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. विवाहबाह्य प्रेमसंबंधातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मोना अग्रवाल यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे.
जंगलात नेमकं काय घडलं होतं?
वर्षा धुरनलाल तुरकर (वय 35) असे मृत महिलेचे नाव असून, त्या पुण्यातील धानोरी परिसरात वास्तव्यास होत्या. मूळच्या मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील किन्ही गावच्या असलेल्या वर्षा या पुणे विमानतळावर एअर इंडियामध्ये कार्यरत होत्या. 14 नोव्हेंबर 2026 रोजी त्यांचा मित्र नितेश ऊर्फ नितीन अग्रवाल हा चारचाकी गाडी घेऊन त्यांना भेटण्यासाठी आला होता. दोघेही तिरोडा येथे फिरण्यासाठी गेले होते. परत येताना गोंदिया जिल्ह्यातील बोंडराणी परिसरातील शिवमंदिराजवळील निर्जन जंगलात त्यांनी गाडी थांबवली. यावेळी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी वर्षा यांच्यावर चाकूने सपासप वार केले. त्यांच्या पोटावर आणि पाठीवर वार करण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सुरुवातीला नितेशने अज्ञात लुटारूंनी हल्ला केल्याचा दावा केला होता. मात्र, वर्षा यांच्या अंगावरील सोन्याची साखळी आणि दागिने सुरक्षित असल्याने पोलिसांना लुटमारीच्या कथेबाबत संशय आला.
हे ही वाचा : ‘माझ्याशी लग्न कर, अन्यथा फोटो व्हायरल करतो’, 18 वर्षीय तरूणी अक्षरश: वैतागली; अन्...
कोणी केली हत्या?
या हत्येचा तपास करण्यासाठी गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे आणि अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने सहा विशेष पथके तयार केली. पोलिसांनी घटनास्थळापासून तिरोडा, खैरलांजी, वाराशिवनी, बालाघाट आणि गोंदिया परिसरातील सुमारे 200 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. यावेळी नितेशच्या कारचा तीन तरुण दुचाकीवरून पाठलाग करत असल्याचे समोर आले. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी 19 नोव्हेंबर रोजी गोंदियातील मुर्री परिसरातून इमरान करीम शेख (वय 26) याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता हत्येमागील धक्कादायक कट उघड झाला. नितेश आणि वर्षा यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा संशय नितेशची पत्नी मोना अग्रवाल (वय 41) हिला होता. याच संशयातून तिने वर्षा यांना संपवण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने परिचयातील कुणाल श्यामलाल कुंभलकर (वय 31) याची मदत घेतली. कुणालने शाहरुख खान फिरोज खान पठाण (वय 33) याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर वर्षा यांच्या हत्येसाठी तब्बल 13 लाख रुपयांची सुपारी निश्चित करण्यात आली.
हे ही वाचा : पोलीस उपनिरीक्षक महिला हेड कॉन्स्टेबलच्या प्रेमात आकंठ बुडाला, शेवटी जंगलात सापडला सांगाडा
लोकेशन कसं सापडलं?
शाहरुख पठाण याने ही हत्या घडवून आणण्यासाठी इमरान शेख, नलेन ऊर्फ नायला शेख (वय 24) आणि क्रिश राऊत (वय 19) या तिघांना तयार केले होते. मात्र, या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हल्लेखोरांना वर्षा आणि नितेश यांची जंगलातील अचूक लोकेशन कशी मिळाली, याचा उलगडा झाला. नितेश ज्या कारमधून वर्षा यांच्यासोबत फिरत होता, ती कार त्याची पत्नी मोना हिच्या नावावर होती. या कारमध्ये टोयोटा आय-कनेक्ट (Toyota i-Connect) ही जीपीएस ट्रॅकिंग सुविधा होती. मोनाने या सुविधेचा आयडी आणि पासवर्ड हल्लेखोरांच्या मोबाईलमध्ये सक्रिय करून दिला होता. त्यामुळे हल्लेखोर घरबसल्या नितेशच्या कारची लाईव्ह लोकेशन पाहत होते. नितेशची कार बोंडराणी येथील निर्जन जंगलात थांबताच त्यांनी तिथे पोहोचून वर्षा यांच्यावर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. अशा प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करून नियोजनबद्ध पद्धतीने हा हत्येचा कट रचण्यात आला होता.
हे ही वाचा : पतीला सोडायला लावलं, लग्नाचं स्वप्न दाखवलं; 8 महिन्यांनी परदेशी विद्यार्थ्याचा खरा चेहरा उघड!
13 लाखांची सुपारी
या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर सेलने संयुक्त कारवाई करत मुख्य सूत्रधार मोना अग्रवाल, मध्यस्थ कुणाल कुंभलकर, सुपारी घेणारा शाहरुख पठाण आणि हत्येत सहभागी इमरान शेख या चौघांना अटक केली आहे. त्यांना पुढील तपासासाठी दवनीवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर या हत्येत सहभागी असलेले नलेन शेख आणि क्रिश राऊत हे दोघे अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास दवनीवाडा पोलीस करत आहेत. विवाहबाह्य प्रेमसंबंधाच्या संशयातून पत्नीनेच 13 लाखांची सुपारी देऊन पतीच्या मैत्रिणीची हत्या घडवून आणल्याचा हा प्रकार उघड झाल्याने बालाघाट आणि गोंदिया जिल्ह्यांत मोठी खळबळ उडाली आहे.
