प्रकाश सोळंकेंनी का केली राजकीय वारसदार म्हणून मुलाऐवजी पुतण्याची निवड?
राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रकाश सोळंकेंनी राजकीय निवृत्तीची घोषणा करत राजकीय वारसदार म्हणून पुतण्याची निवड केली. आता सोळंकेंनी संभाव्य राजकीय संघर्ष टाळला की या घोषणेमागे अजून काही वेगळंच राजकारण दडलंय, हे बघणं रंजक ठरणार आहे.
ADVERTISEMENT

बीड: "जसं प्रेम मला आणि माझे वडील सुंदरराव सोळंकेंना दिलंत, तसंच जयसिंग भैयांना द्या. पुढच्या निवडणुकीत आपण जयसिंग भैयांना उमेदवारी देणार आहोत," अशी घोषणा माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केली आणि सोळंके यांच्या राजकीय निवृत्तीच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या. 'पुन्हा एकदा' अशा अनुषंगाने की प्रकाश सोळंके यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील अशीच घोषणा केली होती, मात्र ऐनवेळी पलटी मारत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुतणे जयसिंग सोळंके यांना आपल्या आमदारकीच्या स्वप्नांना पाच वर्षांसाठी आवर घालावा लागला. त्यामुळेच यावेळी देखील असंच काही होणार नाही ना, अशा शंका-कुशंका व्यक्त व्हायला लागल्या आहेत.
सोळंकेंनी संभाव्य काका-पुतण्या संघर्ष टाळला?
प्रकाश सोळंकेंच्या राजकीय निवृत्तीची घोषणा, त्यांनी आपले राजकीय वारसदार म्हणून मुलाऐवजी पुतण्याची केलेली निवड यामुळे देखील चर्चेत आहे. राज्याला आणि मराठवाड्याच्या राजकारणाला काका-पुतण्यांचा राजकीय संघर्ष काही नवीन नाही. मुंडे कुटुंबातील संघर्ष असो किंवा क्षीरसागर आणि पंडित कुटुंबातील सत्तेचा संघर्ष; बीड जिल्हा तर यात सर्वात आघाडीवर आहे. काका-पुतण्यांच्या राजकीय संघर्षात कुटुंब आणि राजकीय पक्षात उभी फूट पडताना यापूर्वी अवघ्या महाराष्ट्राने बघितले आहे. प्रकाश सोळंके यांनी मात्र कुटुंबातील हा संभाव्य संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केल्याचे सध्या तरी दिसतेय.
हे ही वाचा>> गिरीश महाजन अन् एकनाथ खडसे यांच्या संघर्षाचा रक्षा खडसे यांना फटका?
जयसिंग सोळंके हे प्रकाश सोळंकेंचे बंधू धैर्यशील सोळंके यांचे चिरंजीव आहेत. धैर्यशील सोळंके बीडच्या स्थानिक राजकारणात सक्रिय राहिलेले आहेत. जयसिंग सोळंके देखील त्यांचाच वारसा पुढे चालवत आहेत. याउलट प्रकाश सोळंके यांचे चिरंजीव वीरेंद्र सोळंके यांचं अधिक लक्ष उद्योगधंद्यात राहिलेलं आहे. सध्या ते माजलगाव कारखान्याचे चेअरमन देखील आहेत. मात्र, त्यांनी माजलगावच्या सक्रिय राजकारणात फारसा रस घेतल्याचे दिसत नाही.
माजलगावच्या राजकारणावर जवळून लक्ष असणाऱ्या काही स्थानिक पत्रकारांमध्ये मात्र प्रकाश सोळंकेंनी पुतण्याला प्राधान्य देत संभाव्य कौटुंबिक संघर्ष टाळल्याच्या राजकीय विश्लेषणाविषयी मतभिन्नता असल्याचे बघायला मिळतेय. प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रकाश सोळंके पुढची निवडणूक लढवणार नाहीत, याविषयी शंका नसली तरी सध्या दिलेल्या शब्दाला जागत ते आमदारकीच्या तिकिटासाठी जयसिंग सोळंके यांनाच प्राधान्य देतील, याविषयी अनेकांकडून नकारघंटा वाजवली जातेय. जिल्ह्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ही घोषणा करून प्रकाश सोळंके यांनी जयसिंग सोळंके यांना सध्या तरी तात्पुरतं खूश केल्याचं सांगितलं जातंय.
मुलाला राजकीय महत्त्वाकांक्षा नाहीत, पण सुनबाईंना आहेत
प्रकाश सोळंकेंचे चिरंजीव वीरेंद्र सोळंके हे जरी राजकीयदृष्ट्या फारसे सक्रिय नसले, तरी त्यांच्या सुनबाई अॅड. पल्लवी वीरेंद्र सोळंके मात्र समाजकारणात सक्रिय आहेत आणि त्यांना राजकीय महत्त्वाकांक्षा देखील आहेत. त्यामुळे सध्या जरी जयसिंग सोळंके यांची उमेदवारी जाहीर केली असली, तरी निवडणुकीच्या तोंडावर नेमकं काय होईल हे सांगता येत नाही. प्रकाश सोळंके यांचे जुने कार्यकर्ते देखील जयसिंग सोळंकेंच्या नावाला फारसे अनुकूल नसल्याचे सांगितले जात आहे.
हे ही वाचा>> 'खोलवरच्या जखमा जालीम औषधानेच भरतात', शंभूराज देसाईंनी वचपा काढला! जयकुमार गोरेंचा यु-टर्न
सोळंकेंनी केलेल्या घोषणेच्या संदर्भात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, ही घोषणा व्यक्तिगत पातळीवरील आहे. व्यक्तिगत पातळीवर आणि शिवाय व्यक्तिगत व्यासपीठावरून देखील. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या राज्य पातळीवरील नेतृत्वाकडून त्याला कसा पाठिंबा मिळेल, हे बघणं रंजक ठरणार आहे. साहजिकच, प्रकाश सोळंके यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत देत वारसदाराची केलेली घोषणा संभाव्य राजकीय संघर्ष टाळणार की नव्या राजकीय संघर्षाला जन्म देणार, याचं उत्तर नजीकच्या भविष्यकाळातच मिळू शकेल.
