गिरीश महाजन अन् एकनाथ खडसे यांच्या संघर्षाचा रक्षा खडसे यांना फटका?
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अनेक दिग्गज नेते बिनविरोध निवडून आले. मात्र, रक्षा खडसे यांना निवडणूक लढावी लागणार असून चंद्रकांत पाटील समर्थक उमेदवाराने माघार घेतलेली नाही.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे जिल्हा बँक निवडणुकीत एकट्या का पडल्या?
चंद्रकांत पाटील समर्थक उमेदवाराने माघार घेतलेली नाही
Jalgaon District Bank Election, जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची सध्या जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची महत्त्वाची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बँकेची निवडणूक 29 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणं पाहायला मिळत आहेत. बँकेचा कारभार गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय नेत्यांच्या प्रभावाखाली राहिला आहे. यंदाही भाजप आणि शिवसेनेतील अनेक दिग्गज नेत्यांनी या निवडणुकीत उमेदवारी केली होती. माघारीच्या दिवशी अनेक उमेदवारांनी माघार घेतल्याने जिल्ह्यातील पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही या निवडणुकीत संधी मिळाली आहे. त्यामुळे माघारीनंतर अनेक मतदारसंघांमधील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अनेक दिग्गज नेते बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासमोर निवडणुकीचे आव्हान कायम आहे. चंद्रकांत पाटील समर्थक उमेदवाराने माघार न घेतल्याने मुक्ताईनगरमधील खडसे परिवार आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.
हेही वाचा : शिवसेना सुनावणी : शिंदेंच्या वकीलांचा युक्तिवाद, न्यायमूर्ती बागची यांचे प्रतिप्रश्न ..काय घडलं?
रक्षा खडसे यांची बिनविरोध निवड होऊ शकली नाही
मात्र, या संपूर्ण घडामोडींमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. खडसे परिवार हा जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्वाचा परिवार मानला जातो. रक्षा खडसे या यापूर्वीही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक होत्या. त्यांचे सासरे एकनाथ खडसे हे देखील राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचे नाव आहे. असे असतानाही माघारीच्या दिवशी त्यांच्या विरोधातील उमेदवाराने माघार घेतली नाही. त्यामुळे इतर दिग्गज नेत्यांप्रमाणे रक्षा खडसे यांची बिनविरोध निवड होऊ शकली नाही. त्यांना आता 29 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. विशेष म्हणजे, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील समर्थक उमेदवाराने माघार न घेतल्याने या निवडणुकीला वेगळे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
हेही वाचा : Personal Finance: जमीन खरेदी करताना कागदपत्रांमधील एक चूक.. तुमचा सगळा व्यवहार टाकेल बिघडवून
चंद्रकांत पाटील समर्थक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
चंद्रकांत पाटील यांनी उभा केलेला समर्थक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम असल्याने रक्षा खडसे यांच्यासमोरील आव्हान कायम आहे. या घडामोडींमुळे महायुतीतील अंतर्गत राजकारणाचाही मुद्दा चर्चेत आला आहे. राज्यात भाजप आणि शिवसेना हे महायुतीत एकत्र असताना जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मात्र वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून रक्षा खडसे यांच्यासाठी माघारीचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला होता का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महाजन यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे याबाबत शब्द टाकला होता का आणि त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही का? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या घडामोडींमुळे गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय संघर्षाचाही संदर्भ चर्चेत येत आहे. मात्र, या सगळ्या चर्चांमागील नेमकी कारणं अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. 29 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानानंतर 30 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत रक्षा खडसे यांच्यासमोर कोणते राजकीय चित्र उभे राहते, याकडे संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
