'खोलवरच्या जखमा जालीम औषधानेच भरतात', शंभूराज देसाईंनी वचपा काढला! जयकुमार गोरेंचा यु-टर्न
Satara District Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी उदयसिंह पाटील उंडाळकर, तर उपाध्यक्षपदी दीपक चव्हाण यांची निवड झाली. यानंतर जयकुमार गोरे आणि शंभूराज देसाई यांच्यात विधानांमधून संघर्ष पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'खोलवरच्या जखमा जालीम औषधानेच भरतात'
शंभूराज देसाईंनी वचपा काढला! जयकुमार गोरेंचा यु-टर्न
Satara District Bank Election : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीवरून महायुतीमधील अंतर्गत मतभेद पुन्हा समोर आले आहेत. बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे उदयसिंह पाटील उंडाळकर यांची, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे दीपक चव्हाण यांची निवड झाली. या निवडीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेने बाजी मारली असून भाजपचा अध्यक्षपदाचा दावा पूर्ण होऊ शकला नाही. या निवडीनंतर महायुतीतील नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
सुरुवातीपासून सातारा जिल्हा बँकेचा अध्यक्ष भाजपचाच होणार, असा ठाम दावा करणारे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आता आपल्या भूमिकेत बदल केल्याचं पाहायला मिळत आहे. अध्यक्ष महायुतीचाच झाला असून ज्यांच्याकडे बहुमत आहे, त्यांचाच अध्यक्ष झाला, असं गोरे यांनी म्हटलं आहे. मात्र, त्यांच्या या भूमिकेवरून राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी झालेल्या कुरघोडीचा शंभूराज देसाईंनी वचपा काढल्याचंही बोललं जातंय.
हेही वाचा : Personal Finance: जमीन खरेदी करताना कागदपत्रांमधील एक चूक.. तुमचा सगळा व्यवहार टाकेल बिघडवून
'कुठलीही निवडणूक अंतिम नसते', शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला
जयकुमार गोरे यांनी भाजप हा जिल्हा बँकेतील सर्वात मोठा पक्ष असल्याने भाजपचाच अध्यक्ष व्हावा, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा चुकीची नव्हती, असंही स्पष्ट केलं. त्याचवेळी उदयसिंह पाटील उंडाळकर यांना अध्यक्षपदासाठी शुभेच्छा दिल्या. महायुतीच्या चर्चेत आपण सहभागी नव्हतो, तर सर्व अधिकार मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना देण्यात आले होते, असा खुलासाही त्यांनी केला. दुसरीकडे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जयकुमार गोरेंच्या विधानावर प्रश्न उपस्थित करत त्यांना प्रत्युत्तर दिलं. 'कुठलीही निवडणूक अंतिम नसते' या विधानाचा अर्थच जयकुमार गोरेंना समजला नसल्याचा टोला देसाईंनी लगावला. एवढंच नाही, तर 'खोलवरच्या जखमा जालीम औषधानेच भरतात,' असं सूचक विधान करत त्यांनी राजकीय संघर्षाचे संकेत दिले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून सुरू झालेला वाद आता महायुतीतील दोन मित्रपक्षांच्या नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला आहे.
हेही वाचा : शिवसेना सुनावणी : शिंदेंच्या वकीलांचा युक्तिवाद, न्यायमूर्ती बागची यांचे प्रतिप्रश्न ..काय घडलं?
शिवेंद्रराजे यांची जिल्हा बँकेवर प्रतिक्रिया
या संपूर्ण घडामोडींवर मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत महायुतीतील वरिष्ठांच्या सूचनेनुसार चर्चा झाली होती. मात्र, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येऊन एकतर्फी निर्णय घेत निवड केली, असा दावा त्यांनी केला. महायुतीमध्येच निवडणूक लढवायची आणि कोणताही वाद होणार नाही, याची खबरदारी घ्यायची, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार आपण युतीधर्म पाळला आणि पक्षासाठी माघारही घेतली, असं शिवेंद्रराजे म्हणाले. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आणि उमेदवारी देताना आपल्या उमेदवारांवर कुरघोड्या करण्याचे प्रयत्न झाले. तरीही पक्ष आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार काम केलं. मात्र, निवडणूक झाल्यानंतर आमचा उल्लेखही टाळण्यात आला, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
सातारा जिल्हा बँक ही शेतकऱ्यांच्या हजारो जीवनाशी आणि त्यांच्या आर्थिक स्थैर्याशी जोडलेली आहे. त्यामुळे राजकीय हेवेदावे किंवा एकमेकांचा वचपा काढण्यासाठी बँकेचा वापर करू नये, अन्यथा बँक अडचणीत येईल, असा इशाराही शिवेंद्रसिंहराजे यांनी दिला. जावळीतील वादाबाबत वरिष्ठांकडे कोणतीही तक्रार केली नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
