Crime News : तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात 37 वर्षीय दिव्यांग महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. घरी सोडण्याच्या बहाण्याने दोन तरुणांनी महिलेला ऑटोरिक्षातून लिफ्ट दिली आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सय्यद जावेद (वय 37) आणि अर्पुला व्यंकटेश (वय 30) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित महिला ऐकू आणि बोलू शकत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 14 आणि 15 नोव्हेंबरच्या मध्यरात्री ही घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला घरी जात असताना दोन्ही आरोपींनी तिला ऑटोरिक्षातून घरी सोडण्याची ऑफर दिली. घरी पोहोचवण्याच्या बहाण्याने त्यांनी महिलेला ऑटोरिक्षात बसवले. मात्र, तिला घरी नेण्याऐवजी आरोपींनी दुसऱ्याच ठिकाणी नेले. तिथे दोघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपींनी महिलेला तिच्या घरी सोडले. या घटनेनंतर पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी 16 नोव्हेंबर रोजी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. अटकेनंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
हेही वाचा : रोहित पवारांनी फडणवीसांवर आरोप करताच सत्यजित तांबे संतापले; थेट फेसबुक पोस्ट,पण कमेंट्स ऑफ
दोघांमध्ये बऱ्याच काळापासून संबंध असल्याचाही प्राथमिक अंदाज
महेश्वरम विभागाचे पोलीस उपायुक्त के. नारायण रेड्डी यांनी इंडिया टुडेशी बोलताना या प्रकरणातील अटकेची माहिती दिली. पीडित महिला विवाहित असून तिला 17 आणि 14 वर्षांची दोन मुले असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात पीडित महिला आणि आरोपींपैकी एका व्यक्तीची पूर्वीपासून ओळख असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांमध्ये बऱ्याच काळापासून संबंध असल्याचाही पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांकडून त्यांच्या पूर्वीच्या संबंधांचीही माहिती घेतली जात आहे. या घटनेमागे आर्थिक वाद असण्याची शक्यताही तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. मात्र, याबाबत अद्याप तपास सुरू आहे.
या प्रकरणातील सर्व परिस्थिती आणि घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. पीडित महिला आणि आरोपी यांच्यातील पूर्वीचे संबंध, संभाव्य आर्थिक वाद तसेच घटनेच्या रात्री नेमके काय घडले? याची माहिती तपासली जात आहे. दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले असले, तरी प्रकरणातील इतर बाबींचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेशी संबंधित संपूर्ण परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT












