Crime News : पत्नीचे अनैतिक संबंध आणि त्यातून पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हरियाणात बोलावून पतीला बेदम मारहाण करत त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर हत्येचा प्रकार लपवण्यासाठी हा मृत्यू रस्ते अपघातात झाल्याचा बनाव रचून विम्याचे पैसे लाटण्याचा कट पत्नी आणि तिच्या प्रियकराने आखल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. सतीश असे मृत व्यक्तीचे नाव असून, राजस्थानमधील कोटपुतली-बहरोड जिल्ह्यातील बारडोद गावात सुमारे आठवडाभरापूर्वी त्याचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला ही हत्या अनोळखी व्यक्तींनी केल्याचा संशय होता.
ADVERTISEMENT
तपासात उघड झाले प्रेमसंबंध
मृतदेहाची तपासणी करताना पोलिसांना सतीशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले. तसेच मृतदेहावर पिकांच्या अवशेषांचे अंश आढळल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, दोन व्यक्ती दुचाकीवरून सतीशचा मृतदेह घेऊन जात असल्याचे दिसून आले. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी राजेश उर्फ राजू मिस्त्री आणि शमशेर उर्फ शिवा या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान राजेशने हत्येच्या कटातील आपला सहभाग कबूल केला. तपासात राजेशचे सतीशची पत्नी रेखा सैनी हिच्यासोबत प्रेमसंबंध असल्याची माहितीही समोर आली.
हे ही वाचा : सेंटर पॉईंट : भाजपला शिंदेंच्या शिवसेनेचा धक्का, वचपा काढला?
विम्यासाठी हत्या?
सतीश हा आपल्या प्रेमसंबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याने त्याला संपवण्याचा कट राजेश आणि रेखा यांनी रचल्याचा पोलिसांना संशय आहे. विशेष म्हणजे, रेखाने सतीशच्या नावावर काही जीवन विमा पॉलिसीही काढल्या होत्या. त्यामुळे सतीशची हत्या करून त्याचा मृत्यू रस्ते अपघातात झाल्याचे भासवायचे आणि त्यानंतर विम्याची रक्कम मिळवायची, अशी योजना आखण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या कटानुसार राजेश आणि शमशेर यांनी सतीशला काही कामाच्या निमित्ताने हरियाणात बोलावून घेतले. तिथे त्याला बेदम मारहाण करण्यात आली. अखेर गंभीर दुखापतींमुळे सतीशचा मृत्यू झाला.
हे ही वाचा : सातारा जिल्हा बँक निवडणूक : भाजपचा छोट्या भावांनी गेम केला, पडद्याआड काय घडलं?
पोलिसांनी काय सांगितले?
दरम्यान, या प्रकरणात सतीशची पत्नी रेखा हिची नेमकी भूमिका काय होती, तसेच विम्याच्या पैशांसाठीच हत्येचा कट रचण्यात आला होता का, याचा पोलीस सखोल तपास करत आहेत. जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रेखा आणि सतीश हे गेल्या काही काळापासून वेगवेगळे राहत होते. प्रेमसंबंध, विम्याची रक्कम आणि हत्येचा बनाव अशा अनेक धक्कादायक बाबी या तपासातून समोर आल्या आहेत. या कटात आणखी कोणाचा सहभाग होता का, याचाही पोलीस शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT












