राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन, मराठवाड्यावर शोककळा

BJP Rajya Sabha MP Ramrao Wadkute passes away : भाजपचे राज्यसभा खासदार आणि धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते रामराव सखाराम वडकुते यांचे वयाच्या 72 व्या वर्षी निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ADVERTISEMENT

BJP Rajya Sabha MP Ramrao Wadkute passes away
BJP Rajya Sabha MP Ramrao Wadkute passes away
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

point

मराठवाड्यावर शोककळा

BJP Rajya Sabha MP Ramrao Wadkute passes away : भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार आणि मराठवाड्यातील धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते रामराव सखाराम वडकुते यांचे निधन झाले आहे. वयाच्या 72 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. दिल्ली येथे असताना मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर भाजपसह मराठवाड्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.

7 महिन्यांपूर्वी घेतली होती राज्यसभेच्या खासदारकीची शपथ 

रामराव वडकुते यांनी अवघ्या सात महिन्यांपूर्वी राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली होती. मार्च 2026 मध्ये भाजपने महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी त्यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर 3 एप्रिल 2026 रोजी त्यांनी खासदारकीची शपथ घेतली. नानाजी देशमुख यांच्यानंतर हिंगोली जिल्ह्यातून राज्यसभेवर जाणारे ते भाजपचे पहिले नेते ठरले होते. त्यांच्या सात महिन्यांच्या संसदीय कार्यकाळात सभागृहातील उपस्थिती 100 टक्के होती. या काळात त्यांनी 14 चर्चांमध्ये सहभाग घेतला, तर 32 प्रश्न विचारले होते. जून 2026 मध्ये त्यांची नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमेचे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती.

हेही वाचा ; Solapur Drought : 300 फूट खोल भीमा सीना बोगद्यात काय आहे? शेतकऱ्यांचा संघर्ष तुम्हीच पाहा..

मराठवाड्यातील धनगर समाजाचे प्रमुख नेते म्हणून ओळखले जायचे 

रामराव वडकुते यांचा राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सुरू झाला होता. 2004 ते 2019 या कालावधीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार म्हणून काम केले. त्यानंतर ऑक्टोबर 2019 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 2021 मध्ये त्यांच्याकडे भाजपच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. याशिवाय त्यांनी अहिल्यादेवी होळकर शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते. मूळचे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी भागातील असलेले वडकुते हे मराठवाड्यातील धनगर समाजाचे प्रमुख नेते म्हणून ओळखले जात होते. तळागाळातील कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क होता. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कामामुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.

रामराव वडकुते यांच्या निधनाने भाजपसह परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. मराठवाड्यातील धनगर समाजाच्या राजकारणातील एक महत्त्वाचे नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. विधानपरिषदेचे आमदार, भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या होत्या. राज्यसभेवर निवडून गेल्यानंतर अवघ्या सात महिन्यांतच त्यांचे निधन झाल्याने त्यांच्या राजकीय प्रवासाला अचानक पूर्णविराम मिळाला आहे. आज त्यांचे पार्थिव दिल्लीहून परभणी येथे आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.