Solapur Drought : 300 फूट खोल भीमा सीना बोगद्यात काय आहे? शेतकऱ्यांचा संघर्ष तुम्हीच पाहा..
Solapur Drought : सोलापूरच्या माढा तालुक्यातील ढवळस गावात पाण्यासाठी शेतकरी 300 फूट खोल बोगद्यात उतरून बंद पडलेल्या मोटारींची दुरुस्ती करत आहेत. दुष्काळातून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांनी महिनाभर 200 क्युसेक पाणी सोडण्याची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
Solapur Drought : 300 फूट खोल भीमा सीना बोगद्यात काय आहे?
शेतकऱ्यांचा संघर्ष तुम्हीच पाहा..
Solapur Drought : सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना माढा तालुक्यातील ढवळस गावातील शेतकऱ्यांवर पाण्यासाठी जीव धोक्यात घालण्याची वेळ आली आहे. पिकं आणि जनावरं वाचवण्यासाठी शेतकरी तब्बल 300 फूट खोल अंधाऱ्या बोगद्यात उतरून बंद पडलेल्या मोटारींची दुरुस्ती करत आहेत. भीमा आणि सीना नद्यांना जोडणाऱ्या 19 किलोमीटर लांबीच्या बोगद्यात हजारो मोटारी, पाईप आणि विजेच्या तारांचं जाळं आहे. या बोगद्यात उतरून मोटारी सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा बनलेल्या या परिस्थितीत शेतकरी आपला जीव धोक्यात घालून शेती वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. पाण्याअभावी हातातोंडाशी आलेली पिकं करपू लागली असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे.
मोटारी बंद पडल्यास पुन्हा बोगद्यात उतरून दुरुस्ती करावी लागते
भीमा आणि सीना या दोन नद्यांना जोडणारा हा 19 किलोमीटर लांबीचा बोगदा करमाळा तालुक्यातील कंदर गावापासून सुरू होतो आणि माढा तालुक्यातील कवे गावाजवळ बाहेर पडतो. आशिया खंडातील सर्वात मोठ्या पाण्याच्या बोगद्यांपैकी एक म्हणून या बोगद्याची ओळख सांगितली जाते. या बोगद्यातून सुमारे 900 क्युसेक पाणी सोडलं जातं. बोगद्यात ठिकठिकाणी मोटारी बसवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. ढवळस परिसरात बोगद्याची खोली तब्बल 300 फूट आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी पाणी उपसण्यासाठी हजारो मोटारी बसवल्या आहेत. एका मोटारीचं वजन साधारण 150 ते 200 किलो असून एका मोटारीच्या संचासाठी सुमारे 70 हजार रुपये खर्च येतो. याशिवाय केबल, पाईप आणि स्टार्टरसाठीही मोठा खर्च करावा लागतो. एका मोटारीसाठी सुमारे 200 ते 230 मीटर केबल लागते. स्टार्टरची किंमत जवळपास 15 हजार रुपये आहे. मोटार, पाईपलाईन आणि इतर साहित्याचा खर्च मिळून एका संचासाठी दोन ते अडीच लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. एवढा खर्च करून बसवलेल्या मोटारी बंद पडल्यास शेतकऱ्यांना पुन्हा बोगद्यात उतरून त्यांची दुरुस्ती करावी लागते.
या बोगद्यावर माढा तालुक्यातील 15 ते 20 गावांचं भवितव्य अवलंबून आहे. परिसरात तीन ते चार हजार कृषी पंप असून सुमारे अडीच हजार हेक्टर क्षेत्र या पाण्यावर अवलंबून आहे. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांनी बंद पडलेल्या मोटारी आणि पाईपलाईनची दुरुस्ती सुरू केली आहे. उजनी धरणातून याच बोगद्याद्वारे 900 क्युसेक पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू असल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळण्याची आशा आहे. मात्र, या पाण्याचा स्थानिक शेतकऱ्यांना पुरेसा फायदा होत नसल्याची त्यांची तक्रार आहे. उजनी धरण जवळ असूनही त्याचा अपेक्षित उपयोग होत नसल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. धरणातून इतर भागांना पाणी जात असताना स्थानिक शेतकऱ्यांना मात्र पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. उन्हाळ्यात विजेचा पुरवठा केवळ दोन तास होत असल्याने मोटारी बंद पडल्यास किंवा केबल तुटल्यास पिकांना पाणी देणं कठीण होतं. वीजपुरवठा नियमित नसल्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांकडूनही पाणी मिळणं शक्य होत नाही. त्यामुळे मोटारींच्या दुरुस्तीबरोबरच नियमित वीजपुरवठ्याचीही गरज शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या भागातील शेतकऱ्यांनी शासन आणि प्रशासनाकडे किमान महिनाभर 200 क्युसेक पाणी सोडण्याची मागणी केली आहे. एवढं पाणी मिळाल्यास हातातोंडाशी आलेली पिकं वाचवता येतील आणि जनावरांसाठी चारा उपलब्ध होऊ शकेल, अशी त्यांची अपेक्षा आहे. सरकारकडून एआय डेटा सेंटरसाठी अर्धा टीएमसी पाणी देण्याची चर्चा असताना दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांनाही पाणी मिळावं, अशी मागणी या भागातील शेतकरी करत आहेत. 200 क्युसेक पाणी महिनाभर उपलब्ध झाल्यास दोन तालुक्यांतील गावांना दिलासा मिळू शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे. सध्या पाणी येण्याच्या आशेने शेतकरी 300 फूट खोल बोगद्यात उतरून मोटारींची दुरुस्ती करत आहेत. अंधार, मोटारींचं वजन, विजेच्या तारांचं जाळं आणि मर्यादित जागा अशा परिस्थितीत त्यांना काम करावं लागत आहे. पिकं आणि जनावरं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतःचा जीव धोक्यात घालावा लागत असल्याचं या परिस्थितीतून समोर आलं आहे. त्यामुळे प्रशासन आणि शासन या मागणीची दखल घेऊन बोगद्यात 200 क्युसेक पाणी सोडणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
