Crime News : अवघ्या 120 चौरस फुटांच्या जमिनीच्या वादातून जिम ट्रेनरची त्याच्याच दोन भावांनी आणि पुतण्यांनी मिळून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाहिद असे मृत जिम ट्रेनरचे नाव असून, तो जिम ट्रेनर म्हणून काम करण्यासोबतच किराणा दुकानही चालवत होता. त्याचा मोठा भाऊ अफसर आणि धाकटा भाऊ बंटी कुरेशी यांच्यासोबत जमिनीवरून वाद सुरू होता. या जमिनीचा खटला कुटुंबीयांनी न्यायालयात जिंकला होता. मात्र, तरीही अफसर आणि बंटी जमिनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होते. उत्तर प्रदेशातील आग्रा येथील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांनी थांबवले बांधकाम
सोमवारी (16 नोव्हेंबर) अफसर आणि बंटी काही लोकांसह वादग्रस्त जागेवर पोहोचले आणि तिथे बांधकाम सुरू केले. शाहिदने याला विरोध करत पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बांधकाम थांबवले. मात्र, मंगळवारी पुन्हा दोन्ही कुटुंबांतील महिलांमध्ये जमिनीवरून वाद झाला. यानंतर शाहिद आणि त्याचा मित्र दिलशाद हे दुचाकीवरून पोलिसांत तक्रार देण्यासाठी निघाले असता, घरापासून अवघ्या 150 मीटर अंतरावर आरोपींनी त्यांना अडवले. सुरुवातीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दोघांनाही दुचाकीवरून खाली पाडण्यात आले.
हे ही वाचा : Govt Jobs : भारतीय कृषी संशोधन परिषदेत नोकरीची संधी, एक लाख रुपयांहून अधिक पगार
अवघ्या 17 सेकंदातच...
दरम्यान, अफसरची मुले मेहताब आणि आफताबही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शाहिदवर दगडांनी हल्ला केला. शाहिद जमिनीवर कोसळल्यानंतर मेहताबने मोठा दगड उचलून त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर अवघ्या 17 सेकंदांत चार वेळा जोरदार प्रहार केले. या हल्ल्यात शाहिद गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह नाल्यात फेकण्याचाही प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी आरडाओरड केल्याने आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. शाहिदचा मित्र दिलशादने घरी जाऊन कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी शाहिदला आधी पोलीस ठाण्यात आणि नंतर जिल्हा रुग्णालयात नेले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
हे ही वाचा : मुंबईची खबर : कचरा व्यवस्थापनासाठी BMC चा नवा प्लॅन, भरावे लागणार दरमहा 235 रुपये
आरोपी कुठे लपले?
शाहिदच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेप्रकरणी दिलशादच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली असून विविध ठिकाणी छापे टाकले जात आहेत. अवघ्या 120 चौरस फुटांच्या जमिनीच्या वादातून सख्ख्या भावांनी आणि पुतण्यांनी मिळून केलेल्या या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT












