Solapur Drought | पाण्यासाठी 300 फूट खोल बोगद्यात उतरले शेतकरी; राजेंद्र राऊत यांच्यावर थेट आरोप

Solapur Drought : माढा तालुक्यातील ढवळस गावात पाण्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष तीव्र झाला आहे. 200 क्युसेक पाण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर आरोप केले आहेत.

ADVERTISEMENT

Solapur Drought
Solapur Drought
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

Solapur Drought | पाण्यासाठी 300 फूट खोल बोगद्यात उतरले शेतकरी;

point

राजेंद्र राऊत यांच्यावर थेट आरोप

Solapur Drought , सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना माढा तालुक्यातील ढवळस गावात पाण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. पिकांना पाणी मिळावे आणि जनावरांची तहान भागावी, यासाठी शेतकरी जीव धोक्यात घालून प्रयत्न करत आहेत. उजनी धरणातून कंदरमार्गे सीना नदीकडे जाणाऱ्या पाण्याच्या बोगद्यावर परिसरातील अनेक गावांमधील शेतकऱ्यांची शेती अवलंबून आहे. या बोगद्यातून पाणी उपसण्यासाठी शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून पाइपलाइन आणि मोटारींची व्यवस्था केली आहे. मात्र, पाण्याचा प्रवाह बंद झाल्यानंतर किंवा मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यानंतर मोटारी, केबल आणि पाइपलाइनमध्ये बिघाड होतो. या दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना सुमारे 300 फूट खोल बोगद्यात उतरावे लागत आहे. बोगद्यात अंधार, पाण्याच्या मोटारी आणि वायरांचे जाळे अशा धोकादायक परिस्थितीत शेतकरी काम करत आहेत.

बोगद्यातून पाणी सोडण्यात आल्यानंतर दोन्ही मोटारी खराब झाल्या

ढवळससह केम, पाथर्डी, भोघेवाडी, वडाचीवाडी आणि परिसरातील पाच ते सात गावांमधील शेतकऱ्यांची पाण्यासाठीची भिस्त याच बोगद्यावर आहे. सध्या पाण्याअभावी ऊस, फळबागा आणि इतर पिके धोक्यात आली आहेत. काही शेतकऱ्यांच्या विहिरी आणि बोअरवेलचे पाणीही आटले आहे. एका शेतकऱ्याने दोन बोअरवेल घेतल्या होत्या. त्यातून अडीच-अडीच इंच पाणी लागले होते. मात्र, बोगद्यातून पाणी सोडण्यात आल्यानंतर दोन्ही मोटारी खराब झाल्या. आता त्या पाण्याचा वापरही करता येत नसल्याची त्यांची व्यथा आहे. काही शेतकऱ्यांच्या उसाला आठ ते दहा दिवसांपासून पाणी मिळालेले नाही. फळबागायतदारांची परिस्थितीही गंभीर आहे. आंबा, डाळिंब आणि द्राक्षबागांना पाणी मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. जनावरांना पिण्यासाठी पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था करण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

तातडीने 200 क्युसेक पाणी सोडण्याची मागणी

या परिस्थितीत शेतकऱ्यांनी सरकारकडे तातडीने 200 क्युसेक पाणी सोडण्याची मागणी केली आहे. हे पाणी मिळाल्यास किमान पुढील एक ते दोन महिने ऊस आणि इतर पिके वाचू शकतील, अशी त्यांची अपेक्षा आहे. मात्र, पाण्याच्या उपलब्धतेबरोबरच वीजपुरवठ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पाणी असतानाही दिवसातून केवळ दोन तास वीज मिळते. या वेळेत सात ते आठ गावांच्या पाइपलाइनमधून पाणी पोहोचणे शक्य होत नाही. शिवाय, 15 ते 60 अश्वशक्तीच्या मोटारींची वीजबिलेही शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. एका शेतकऱ्याने 8 लाख 70 हजार रुपयांचे वीजबिल असल्याचे सांगितले, तर दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावर 10 लाख 50 हजार रुपयांचे बिल असल्याचे सांगण्यात आले. पाणी केवळ दोन महिने मिळत असताना उर्वरित काळातील वीजबिल भरायचे कसे, असा सवाल शेतकरी करत आहेत.

राजेंद्र राऊत यांच्यावर शेतकऱ्यांचे थेट आरोप

दरम्यान, या पाणीप्रश्नावरून बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यावरही शेतकऱ्यांनी थेट आरोप केले आहेत. त्यांच्या उपसा सिंचन योजनेसाठी पाणी कमी पडत असल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पत्र देऊन कंदरकडील वीजपुरवठा बंद करण्याची मागणी केल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे पाणी उपलब्ध नसतानाही एक दिवसाआड सहा तास वीजपुरवठा बंद ठेवला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. बोगद्यातून पाणी वाहून जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी दोन फुटांचे छोटे अडथळे उभारले आहेत. मात्र, हे अडथळे काढण्याची मागणीही आमदार राजेंद्र राऊत करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. बार्शीतील शेतकऱ्यांप्रमाणेच माढा तालुक्यातील शेतकऱ्यांचाही विचार व्हावा, अशी त्यांची मागणी आहे. दरवर्षी या परिसरातील 10 ते 12 गावांमधून दीड ते दोन कोटी रुपये वीजबिल आणि पाणीपट्टीच्या स्वरूपात जमा होत असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. आता तातडीने 200 क्युसेक पाणी सोडले नाही, तर हातातोंडाशी आलेली पिके आणि जनावरांसाठीचा चारा वाचवणे कठीण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.