Maharashtra weather : नोव्हेंबरच्या अखेरीस वातावरणात नवे बदल, थंडी नसून आता भलताच अलर्ट
Maharashtra weather: नोव्हेंबरच्या अखेरीस महाराष्ट्रातील वातावरणात नवे बदल दिसून येत असून, गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या पहाटेच्या थंडीची तीव्रता काही प्रमाणात घटण्याची चिन्हे आहेत. पुणे आणि उत्तर महाराष्ट्रात गारठा जाणवत असला, तरी राज्याच्या अनेक भागांत किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नोव्हेंबरच्या अखेरीस महाराष्ट्रातील वातावरणात नवे बदल
राज्याच्या अनेक भागांत किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज
Maharashtra Weather : नोव्हेंबरच्या अखेरीस महाराष्ट्रातील वातावरणात नवे बदल दिसून येत असून, गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या पहाटेच्या थंडीची तीव्रता काही प्रमाणात घटण्याची चिन्हे आहेत. पुणे आणि उत्तर महाराष्ट्रात गारठा जाणवत असला, तरी राज्याच्या अनेक भागांत किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, 23 नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यात हवामान प्रामुख्याने कोरडे राहील आणि पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.
हे ही वाचा : उल्हासनगरच्या CHM कॉलेजच्या नव्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
कोकण
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सोमवारी पावसाचे संकेत नसून कोरडे वातावरण राहील. समुद्रकिनाऱ्याजवळील आर्द्रतेमुळे अंतर्गत भागांच्या तुलनेत थंडावा कमी जाणवते. दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री काहीसा गारवा राहू शकते. येत्या काही दिवसांत तापमानात फारसा फरक पडण्याची शक्यता नसल्याने कोकणातील हवामान सर्वसाधारणपणे स्थिर राहील.
मध्य महाराष्ट्र
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत सोमवारी हवामान कोरडे राहणार आहे. पुणे परिसरात सकाळी किंचित गारठा जाणवेल, तर दुपारी ऊन तापलेले राहील. कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर सकाळी थंड हवा अनुभवायला मिळेल. मात्र, किमान तापमान वाढण्याची शक्यता असल्याने सध्याचा गारवा आणखी वाढण्याऐवजी काहीसा मवाळ होऊ शकतो.
उत्तर महाराष्ट्र
नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांत सध्या पहाटे थंडीची जाणीव होत आहे. परंतु, पुढील दोन दिवसांत राज्याच्या बहुतांश भागांत किमान तापमानात थोडी वाढ होण्याचा अंदाज असल्याने सकाळचा गारवा काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांत पारा पुन्हा घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही ठिकाणी थंडावा कायम असला, तरीही तापमानात चढ-उतार जाणवण्याची शक्यता आहे.
मराठवाडा
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांत सोमवारी हवामान कोरडे राहील. पहाटे आणि रात्री जाणवणारा गारवा थोडा कमी होण्याची शक्यता असून, दिवसा उन्हाचा चटका अधिक राहील. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांत किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मराठवाड्यातील थंड वातावरणात काही प्रमाणात बदल जाणवण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : पैसा- पाणी : इन्फोसिसने 11 वर्षांपूर्वीची 'ती' संधी का गमावली? आज AI क्षेत्रात भारत कुठे असता?
विदर्भ
नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत सोमवारी हवामान कोरडे राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याआधी काही भागांत हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली गेली होती; मात्र 22 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या सुधारित प्रादेशिक अंदाजानुसार 23 नोव्हेंबरपासून विदर्भातही कोरडे हवामान राहील. त्यामुळे पावसाची शक्यता मावळल्याने येथील नागरिकांना दिलासा मिळणार असून, आता तापमानात होणाऱ्या बदलांकडे लक्ष द्यावे.
