मुंबईची खबर : मुंबईकरांची ट्राफिकमधून सुटका होणार! काय आहे 'पाताळ लोक' प्रकल्प?
मुंबईकरांची ट्राफिकमधून सुटका करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसमोर एका नव्या प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. पाताळलोक हा प्रकल्प नेमका काय आहे?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भूमिगत रस्ते बोगदा प्रकल्पाचा प्रस्ताव
नेमका काय आहे प्रकल्प?
Mumbai News : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि पूर्व-पश्चिम मुंबईतील रस्ते संपर्क अधिक वेगवान करण्यासाठी राज्य सरकारने एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा विचार सुरू केला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) तब्बल 31 किलोमीटर लांबीच्या एकात्मिक भूमिगत रस्ते बोगदा प्रकल्पाचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादर केला आहे. या प्रकल्पाला 'पाताळ लोक' असे नाव देण्यात आले आहे. गुरुवारी (19 नोव्हेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली.
नेमका प्लॅन काय आहे?
एमएमआरडीएच्या प्रस्तावानुसार, या भूमिगत रस्ते बोगद्याची एका दिशेने अंदाजे 31 किलोमीटर लांबी असेल. मुंबईतील महत्त्वाची ठिकाणे, व्यावसायिक केंद्रे आणि वाहतूक मार्ग एकमेकांशी जोडण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प आखण्यात आला आहे. या बोगद्याच्या माध्यमातून वांद्रे-वरळी सी लिंक, वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) बुलेट ट्रेन स्थानक, धारावी आणि बीकेसीमधील व्यावसायिक परिसर जोडला जाणार आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल 2, पश्चिम द्रुतगती मार्ग आणि पूर्व द्रुतगती मार्गालाही या नेटवर्कशी जोडण्याचे नियोजन आहे.
हे ही वाचा : कोकण रेल्वेच्या वाहतुकीचे वेळापत्रक विस्कळीत, कोकणकन्यासह 'या' गाड्यांना सात तासांचा विलंब
भूमिगत रस्त्यांमुळे फायदा
हा प्रकल्प प्रत्यक्षात साकारल्यास मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम भागांमधील प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः विमानतळ आणि बीकेसीसारख्या महत्त्वाच्या व्यावसायिक केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ कमी होऊ शकतो. तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहनांचा ताण कमी होण्यास मदत होईल. भूमिगत रस्त्यांमुळे गर्दीच्या भागांमधून वाहतुकीला पर्यायी मार्ग उपलब्ध होणार असून, मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरू शकतो.
हे ही वाचा : राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन, मराठवाड्यावर शोककळा
अंतिम मंजुरी कधी मिळणार?
दरम्यान, मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांवर भर दिला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून 'पाताळ लोक' या 31 किलोमीटरच्या भूमिगत बोगदा प्रकल्पाचा प्रस्ताव पुढे आला आहे. मात्र, सध्या हा प्रकल्प प्रस्तावाच्या टप्प्यावर असून, त्याला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतरच पुढील प्रक्रिया स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सरकारकडून कधी हिरवा कंदील मिळतो आणि प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होते, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
