वकिलाची हत्या करुन आरोपी 2 हजार किलोमीटर लांब लपला, पोलिसांनी कसा काढला माग?
एका वकिलाची हत्या करुन पोलिसांपासून लपण्यासाठी आरोपीने तब्बल 2 हजार किमींचा प्रवास केला. बंगळुरु पोलिसांनी आरोपीचा माग कसा काढला?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वकिलाच्या हत्येनं खळबळ
आरोपीने 2 हजार किमीचा प्रवास का केला?
Crime News : बंगळुरूमध्ये एका वकिलाची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर पोलिसांच्या भीतीने आरोपीने तब्बल 2 हजार किलोमीटर दूर बिहार गाठले. अमित कुमार दुबे असे या 25 वर्षीय आरोपीचे नाव आहे. त्याने पोलिसांना चकवा देण्यासाठी बंगळुरूपासून बिहारपर्यंतचा प्रवास दुचाकीवरून केला. यासाठी त्याने तेलंगणा, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांतून प्रवास केला. ओळख लपवण्यासाठी संपूर्ण प्रवासात जॅकेट आणि फुल फेस हेल्मेटचा वापर केला. प्रवासादरम्यान पैशांची गरज भासल्याने हैदराबादमध्ये त्याने स्वतःचा एक मोबाईलही विकला. अखेर बंगळुरू पोलिसांनी त्याला बिहारमधील एका गावातून अटक केली.
दोघांनी केली वकिलाची हत्या
ही घटना बंगळुरूच्या व्हाइटफिल्ड परिसरातील आहे. 19 ऑक्टोबर रोजी 43 वर्षीय वकील मणुनाथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी व्हाइटफिल्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासासाठी अनेक पथके तयार केली आणि कर्नाटकसह तमिळनाडू, तेलंगणा, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये आरोपींचा शोध सुरू केला. या हत्येप्रकरणी अमित कुमार दुबे आणि पवन कुमार दुबे हे दोघे मुख्य आरोपी असल्याचे समोर आले. पोलिसांच्या माहितीनुसार, पवन कुमार दुबे याने वकिलावर गोळी झाडली होती, तर अमित हा त्याला मदत करून फरार झाला होता.
हे ही वाचा : बुलढाण्यात खळबळ! प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, पत्नीनं रचला भयंकर कट
बंगळुरु ते वाराणसी बाईकवरुन प्रवास
हत्या केल्यानंतर अमितने दुचाकीवरून बिहारपर्यंत पळ काढला. या प्रवासात तो हैदराबाद, नागपूर आणि वाराणसी या शहरांतून गेला. बस आणि रेल्वेने प्रवास केल्यास सीसीटीव्हीमध्ये कैद होण्याची शक्यता असल्याने त्याने या प्रवासाचे जाणीवपूर्वक टाळले. रात्रीच्या वेळी रस्त्यावरील ढाब्यांवर थांबून त्याने वेळ काढला. तेथे 200 ते 300 रुपये देऊन खाटेवर झोपत होता. बिहारमधील पटना जिल्ह्यातील धनरुआ ब्लॉकमधील ननौरी गावात तो आपल्या दूरच्या नातेवाईकाच्या घरी राहू लागला. येथे त्याने ओळख लपवून शेतात मजुरी करण्यास सुरुवात केली. त्यातून त्याला दररोज सुमारे 400 रुपये मिळत होते.
हे ही वाचा : मुंबईची खबर : पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय, लवकरच येणार प्रीपेड टॅक्सी
कसा सापडला आरोपी?
दरम्यान, बंगळुरू पोलिसांनी महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज आणि अमितचे जुने कॉल डिटेल रेकॉर्ड तपासले. बंगळुरू-हैदराबाद-नागपूर मार्गावरील फुटेज तपासताना वाराणसीजवळील एका पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीमधून पोलिसांना महत्त्वाचा धागा मिळाला. तसेच अमित बिहारमधील आपल्या आजीला वारंवार फोन करत असल्याचेही तपासात समोर आले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ननौरी गावात पाळत ठेवली आणि अखेर शेतात काम करत असताना अमितला अटक केली. 12 नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. मात्र, या प्रकरणातील दुसरा मुख्य आरोपी पवन कुमार दुबे अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
