Uttar Pradesh Crime News : उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात अनैतिक संबंधांच्या संशयातून पतीने पत्नीची कुऱ्हाडीने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पत्नी दोन मुलांसोबत झोपलेली असताना पतीने तिच्यावर हल्ला केला. 14 वर्षीय मुलाच्या डोळ्यासमोर त्याने पत्नीला क्रूरपणे संपवलंय. त्यानंतर अल्पवयीन मुलानेच आजीला फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून, हत्येसाठी वापरलेली कुऱ्हाडही जप्त केली आहे. गोंडा जिल्ह्यातील कौडिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोटिया मदारा गावात 21 नोव्हेंबरच्या मध्यरात्री ही घटना घडली.
ADVERTISEMENT
हेही वाचा : घटस्फोटावेळचा 'तो' टी-शर्ट पाठ सोडेना; प्रियांका चतुर्वेदींच्या 'गुगली'वर युजवेंद्र चहल क्लीन बोल्ड!
अधिकची माहिती अशी की, मनोज कुमार शुक्ला (वय 34) असे आरोपी पतीचे नाव असून, सुमन शुक्ला (वय 34) असे मृत महिलेचे नाव आहे. सुमन या रात्री आपल्या 14 वर्षांच्या किशन आणि चार वर्षांच्या शगुन या दोन मुलांसोबत घरात झोपल्या होत्या. त्याचवेळी मनोजने कुऱ्हाडीने त्यांच्या डोक्यावर वार केले. या हल्ल्यात सुमन यांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. वडिलांनी आईच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले आणि ते घटनास्थळावरून पळून गेल्याचे 14 वर्षीय मुलाने आजीला सांगितले.
हेही वाचा : विभाचा आजारपणामुळे मृत्यू की विष देऊन हत्या? संतप्त माहेरच्यांनी सासरच्या दारातच केले अंत्यसंस्कार!
परपुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय
नातवाचा फोन आल्यानंतर सुमन यांची आई सीतावती तिवारी कुटुंबातील इतर सदस्य आणि नातेवाईकांसह मुलीच्या घरी पोहोचल्या. त्यावेळी सुमन या रक्ताच्या थारोळ्यात बेडवर मृतावस्थेत पडलेल्या होत्या. या घटनेनंतर त्यांनी मनोज आणि त्याच्या आईविरोधात कौडिया पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गेल्या दोन वर्षांपासून मनोज मुलीचा विनाकारण छळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच मनोजच्या आईकडूनही सुमन यांच्यावर चोरी आणि इतर गैरवर्तनाचे आरोप केले जात होते, असे तक्रारीत म्हटले आहे. मनोजची आई वारंवार त्याला फोन करून सुमन यांना मारहाण करण्यासाठी चिथावणी देत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि तपास सुरू केला.
मनोजला दारूचे व्यसन, अन् मनात संशयाचं भूत
पोलिसांच्या चौकशीत मनोजने पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याचे सांगितले. सुमारे चार वर्षांपूर्वी मनोज पत्नीसोबत पानिपत येथे गेला होता. त्यावेळी सुमन या तिथे कोणाशी तरी फोनवर बोलत असल्याचा संशय मनोजला आला होता. तेव्हापासून तो या गोष्टीवरून नाराज होता. या संशयातून तो पत्नीला वारंवार मारहाण करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मनोजला दारूचे व्यसन असल्याचेही पोलिसांनी सांगितले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितेश सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 नोव्हेंबर रोजी आरोपीला अटक करण्यात आली. कौडिया पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी हत्येसाठी वापरलेली कुऱ्हाडही जप्त केली आहे. या प्रकरणातील पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
ADVERTISEMENT












