Crime News : तीन वर्षांच्या चिमुकलीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी (21नोव्हेंबर) सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास ही चिमुकली अवंतीनगर भूड परिसरातील आपल्या घरातून अचानक बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी परिसरात शोधाशोध केली, मात्र तिचा काहीच पत्ता लागला नाही. अखेर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, चिमुकली दूरवर जाताना कुठेही दिसून आली नाही. त्यामुळे ती परिसरातच असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये ही घटना घडली.
ADVERTISEMENT
बंद खोलीत आढळला मृतदेह
चिमुकलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी श्वानपथकाची मदत घेतली. तिच्या कपड्यांचा वास श्वानाला देऊन परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. यावेळी श्वान एका बंद खोलीकडे गेले. पोलिसांनी खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, तेथील दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. खोलीत तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. ही खोली रोहताश राजपूत यांच्या घरातील असून, तेथे सोनाली नावाची महिला भाड्याने राहत होती. विशेष म्हणजे, चिमुकलीचे घर आणि मृतदेह आढळलेली खोली यांच्यात अवघे 40 मीटर अंतर होते.
हे ही वाचा : कोकण रेल्वेच्या वाहतुकीचे वेळापत्रक विस्कळीत, कोकणकन्यासह 'या' गाड्यांना सात तासांचा विलंब
जादूटोण्याचा संशय
या प्रकरणात सोनाली नावाच्या महिलेवर संशय व्यक्त केला जात असून, पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. स्थानिक नागरिकांमध्ये संबंधित महिला तंत्र-मंत्र आणि जादूटोणा करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास तंत्रक्रियेच्या अंगानेही सुरू केला आहे. बुलंदशहरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक दिनेश कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरील परिस्थिती पाहता प्राथमिकदृष्ट्या तंत्रक्रियेनंतर चिमुकलीचे तोंड दाबून हत्या केल्याचा संशय आहे. मात्र, नेमकी हत्या कशा प्रकारे आणि कोणत्या कारणातून करण्यात आली, हे शवविच्छेदन अहवाल आणि सखोल तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
हे ही वाचा : Govt Jobs : महिन्याला 1 लाख रुपयांहून अधिक पगार हवाय? 'या' बँकेत नोकरीची संधी, लगेच करा अर्ज
नागरिकांचा रास्ता रोको
दरम्यान, चिमुकलीचा मृतदेह आढळल्यानंतर संतप्त कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी दिल्ली रोडवर रास्ता रोको आंदोलन केले. संशयित महिलेविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांची समजूत काढली. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. सध्या पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात असून, संशयित महिलेची चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ADVERTISEMENT












