Sangli Crime News : सांगली जिल्ह्यातील हरिपूर येथील तरुणाचा कोथळी येथे धारदार सुऱ्याने गळ्यावर वार करून खून करण्यात आला. चारचाकी वाहनाला दुचाकीचा कट लागल्याच्या कारणातून हा प्रकार घडल्याची माहिती आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी अभिनंदन ऊर्फ अभी राजगोंडा पाटील-धडेल फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. विकास बाबुराव बोंद्रे असं मृत व्यक्तीचे नाव आहे. मंगळवारी रात्री उशीरा ही घटना घडली.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Weather Report: हिवाळ्यातही उन्हाचा तडाखा? राज्यातील हवामानाचा नवा अंदाज समोर
चारचाकीला कट मारण्याच्या वादातून जीवघेणा हल्ला
अधिकची माहिती अशी की, विकास बोंद्रे हे चारचाकी वाहनातून हरिपूरच्या दिशेने जात होते. त्याचवेळी संशयित आरोपी अभिनंदन ऊर्फ अभी राजगोंडा पाटील-धडेल (वय 36, रा. कोथळी, ता. शिरोळ) हा दुचाकीवरून येत होता. यावेळी चारचाकी आणि दुचाकी वाहनामध्ये कट मारण्यावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर बाचाबाचीमध्ये झाले. त्यानंतर संशयिताने जवळ असलेला धारदार सुरा बाहेर काढला आणि विकास बोंद्रे यांच्या गळ्यावर वार केले. हल्ल्यानंतर संशयित आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. चारचाकी वाहनाला कट मारण्याच्या कारणातून झालेल्या वादात हा जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा : Personal Finance: दागिने तेच, पण बिल हजारोंनी कमी! सोनं खरेदी करताना 'या' 5 गोष्टी नका विसरू
विकास बोंद्रे यांची राजकीय पार्श्वभूमी
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विकास बोंद्रे यांना त्यांच्या मित्राने तातडीने सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच किंवा उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर संशयित आरोपी अभिनंदन ऊर्फ अभी पाटील-धडेल फरार झाला आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती देण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांकडून संशयिताचा शोध सुरू करण्यात आला आहे. वाहनाला कट मारण्यासारख्या कारणातून झालेल्या वादाचा शेवट थेट खुनात झाल्याने परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे. संशयित आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
दरम्यान, मृत विकास बोंद्रे यांची राजकीय पार्श्वभूमी होती. त्यांच्या पत्नी कविता बोंद्रे या हरिपूरच्या माजी सरपंच होत्या. तसेच विकास बोंद्रे यांचे आजोबाही हरिपूरचे सरपंच होते. विकास बोंद्रे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांनी आणि समर्थकांनी सांगलीच्या शासकीय रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विकास बोंद्रे यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. दरम्यान, खून केल्यानंतर फरार झालेल्या संशयित अभिनंदन पाटील-धडेल याचा पोलिसांकडून शोध सुरू असून या प्रकरणातील पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT












